१.
मानापमान गिळले, पोटा तुझ्यामुळे
आयुष्य पार झिजले, नोटा तुझ्यामुळे
वापर करून माझा, गेलास तू पुढे
नशिबात फक्त माझ्या सोटा तुझ्यामुळे
मारून गोड थापा आम्हास भुलविले
झाला प्रचंड माझा तोटा तुझ्यामुळे
अमुची दिवाळखोरी हट्टास पेटली
उरलाय फक्त हाती लोटा तुझ्यामुळे
केले किती कुटाणे अपरोक्ष मी तुझ्या
घासून स्वच्छ केला ओटा तुझ्यामुळे
गेलास बोलुनी तू सारे खरेखुरे
लोकांसमोर ठरलो खोटा तुझ्यामुळे
केलास पार राडा नैंटीच ढोसुनी
शिल्लक पडून आहे कोटा तुझ्यामुळे
ऐकून तीच झिकझिक डोके भणाणले
झालाय पार त्याचा गोटा तुझ्यामुळे
२.
ऐकून घे जरासा, एकच सवाल आहे
हेका उगा कशाला, 'माझीच लाल आहे'
बोलायचे तरी पण, बोलू कुणास आता
माझाच हात आहे, माझाच गाल आहे
समजून घे जरासा प्राॅब्लेम हा मुळातुन
तो सूर वेगळा, हा भलताच ताल आहे
मध्यस्थ तो कशाला, भांडण तुझे नि माझे
केवळ तुझा नि माझा हा सर्व माल आहे
चालू वरून कीर्तन, आतून हा तमाशा
कुठल्या दिशेस नक्की ही वाटचाल आहे
बदलून जीवनाची गेली सबंध शैली
आला कलीयुगाचा हा अंतकाल आहे
चढवून हरभ-याच्या झाडावरी बसविले
लपटून मारलेले जोडे नि शाल आहे
३.
बांधून शब्दसेतू, गागाल गालगागा
टाकू, लिहून टाकू, गागाल गालगागा
गोळा करू कवाफी, घेऊ गझल लिहाया
सोपेच वृत्त शोधू, गागाल गालगागा
दाटून व्यक्त होण्या, येतात भाव जेव्हा
ओळीत दोन ओकू, गागाल गालगागा
डोळ्यांत तेल घालुन, द्या, शोधुद्या चुकांना
मात्रांस मात्र मोजू, गागाल गालगागा
टाकू विरामचिन्हे वाट्टेल त्या ठिकाणी
यमकेच फक्त रेटू, गागाल गालगागा
टांगू लघू-गुरूंना वेशीवरीच उलटे
नियमांस खोल गाडू, गागाल गालगागा
हेतू मुळीच नाही, कोणा दुखावण्याचा
आले मनात बोलू, गागाल गालगागा
४.
वाटते प्रत्येक पुरुषाला मिळावी ती परी
व्यर्थ तुलना करत बसतो ती बरी की ही बरी
आपल्या पदरात पडली वाटते का गोड ती
सांगतो मी सत्य केवळ, का करू मी मस्करी
एकतर आहे चतुर्थी, त्यातही अंगारकी
अवदसा सुचते कशी हो कर म्हणे अंडाकरी
लाॅटरी लाखात एकाद्यास असली लागते
लाडका रावण तिचा मी, आणि ती मंदोदरी
घासते ती सर्व भांडी फक्त धुवुनी ठेवतो
ठेचतो झणझणित ठेचा, थापते ती भाकरी
नेमकी लाडात आली कैक दिवसांतून ती
अन् अचानक टपकलेले पाहुणे माझ्या घरी
सत्य आहे दोस्तहो त्रीकालबाधित या जगी
रे, भरा बिनधास्त पाणी का लपवता घागरी
५.
कोण नाही तो फलाणा, मीच आहे
या जगामध्ये शहाणा मीच आहे
मोजते जिन्नस कशाला चारवेळा
आणलेला तो किराणा मीच आहे
काय सांगू बायकोवर प्रेम माझे
घेतला माझा उखाणा मीच आहे
सांगता का शेखचिल्लीची कहाणी
जाणतो, तुमचा निशाणा मीच आहे
सांगतो ठेवायला सीक्रेट सारे
गावभर करतो ठणाणा मीच आहे
स्वस्थ राहू देत नाही चोंबडेपण
भांडण्याकरता बहाणा मीच आहे
पेरतो मेंदूत अफलातून काही
कोण करतो हा कुटाणा? मीच आहे
No comments:
Post a Comment