दोन गझला : सौ. वैशाली भागवत

 



१.

तुझ्या आठवांनी छळावे मनाला 
किती ते धुमारे फुटावे मनाला 

तुझ्या सोबतीचा किती कैफ आहे 
कसे स्वप्न आता पडावे मनाला 

उभा गोंधळाला पुढे देवतेच्या 
घरी भाकरी पण खुणावे मनाला 

पसारा मनाचा किती होत गेला  
दिशाभूल झाली कळावे मनाला 

तुला आरशाची व्यथा काय सांगू 
खरे रूप केवळ दिसावे मनाला 

दिशा काजव्यांची मला तर कळाली   
दिवे ‘आतले’ मग स्मरावे मनाला 

किती देव देतो पहा एकदा तू 
तरी वावडे का असावे मनाला 

२.

तुझ्या माझ्यातले अंतर जरा मोजून पाहूया 
विचारांची दरी सुद्धा अता खोदून पाहूया 

सुखांची केवढी महती जगी गातात सारे या 
दुखवले ज्या क्षणांनी त्यांसही उकलून पाहूया 

भुलावे मोगऱ्याला ही जगाची रीत आहे ना 
दिले जे घाव त्याने ते जरा उसवून पाहूया

हिशोबाच्या वहीमधली किती छळतात ही पाने 
जमाखर्चास अवघड या कधी तोलून पाहूया 

यशाची मांडली सूत्रे जगाने जोखण्यासाठी 
तयारी आपली पण एकदा मापून पाहूया  

........................
सौ. वैशाली भागवत, 
बडोदे

3 comments:

  1. आदरणीय श्रीकृष्ण राऊत सर आणि संपूर्ण संपादक मंडळाची मनापासून आभारी आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  2. दोन्ही गझला खूप सुंदर वैशाली. ❤

    अंजली आशुतोष मराठे

    ReplyDelete