१.
ते गल्लीचे तारे होते,
दीड शहाणे सारे होते !
त्यांना घेउन काय करावे ?
ते तर केवळ नारे होते !
धूर्तपणाने सिद्धच झाले
त्यांचे डोळे घारे होते
शांत तयांना करणे निष्फळ
त्यांचे चढले पारे होते
उगा घेतले डोक्यावरती
गवताचे ते भारे होते
गोड चवीची नको अपेक्षा
बिस्किटच मुळी खारे होते
गुमान बसले आता सारे
' अविनाश ' चेच वारे होते
२.
काहीच नाही कोणास पर्वा ?
आयुष्य शाही, कोणास पर्वा ?
कष्टास घेतो वाहून जो जो
डोळेच वाही, कोणास पर्वा ?
रस्त्यात कोणी माणूस मेला
कोणी न पाही, कोणास पर्वा ?
डोकी भरा रे , दंगा करा रे,
आदेश हाही कोणास पर्वा ?
दु:खी अशा त्या दु:खास आता
' अविनाश ' साही, कोणास पर्वा ?
३.
शोधण्या चाललो शूर ते मावळे
मात्र हे लाभले शेवटी कावळे !
जोडले हात हे लाखदा मी जरी
ना तरी पावले रूप ते सावळे
कोणता काळ हा ?कोणते लोक हे ?
म्होरके बेरकी,चाहते बावळे !
मोकळे रान हे जाहले दुर्जना
सज्जनांभोवती फास हा आवळे
सूर्य तो येतसे शेवटी जातसे
ना कधी सूर्य ' अविनाश ' चा मावळे
...........................................
डॉ.अविनाश सांगोलेकर,
डी -२०२ , विंडसर रेसिडेन्सी, बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे - ४११०४५
भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२
ई -मेल : sangolekar57@gmail.com
No comments:
Post a Comment