गझल : शिवाजी जवरे

 



तुझ्यामुळे मी उभा म्हणू तर तुला कुठेही मुळेच नसती

मला दिला वंश,कूळ,जाती ऋषीमुनींना कुळेच नसती


तुला न आरंभ अंत आहे तुझा कसा मध्य दाखवू मी

हरेक जागी तुझीच केंद्रे तुला कुठे वर्तुळेच नसती


तुझा सभोवार व्याप आहे तुला न आकार माप आहे

तुझा न दर्गा न चर्च आहे तुझी खरी देउळेच नसती


तऱ्हे तऱ्हेची किती सजावट तुझ्या हवेलीत हस्तिदंती

तरीच म्हटले वनात कोण्या गजामुखी का सुळेच नसती


तुझाच केवळ खरा धर्म अन् तुझ्याच ग्रंथात ज्ञान सारे

तुझ्या मते एक तज्ज्ञ तू पण सकळ विश्वजन खुळेच नसती


क्षणा क्षणाचा हिशेब दे तू क्षणा क्षणाचा हिशेब घे तू

तुला मिळालेत श्वास म्हणजे चण्याविना हुळहुळेच नसती

No comments:

Post a Comment