तीन गझला : शांताराम हिवराळे

 



१.

लाट येते लाट फुटते सागराला काय त्याचे
माणसे घायाळ झाली वादळाला काय त्याचे

भाकरीला पीठ नाही कोणती ही रीत सांगा
प्रश्न मोठा जीवघेणा शासनाला काय त्याचे

रोज येथे पाहतो मी कष्टणारे हात खाली
भ्रष्टतेने मातलेल्या माणसाला काय त्याचे

भावनांची साठमारी चालते बघ रोज येथे
रोज येथे खून होतो घातक्याला काय त्याचे

झोपड्या वाहून गेल्या वेदनेला अंत नाही
पोरका माणूस झाला पावसाला काय त्याचे

स्वप्नवेडे पाखरू पण सांजवेळी दूर गेले
झाड बघ वाळून गेले पाखराला काय त्याचे

माणसांना जोडणारी काळजाची ओल नाही
शब्दही का मूक झाले
या जगाला काय त्याचे

२.

खोट्याला ते खरेच वदती काय म्हणावे
विश्वासाला तडे पाडती काय म्हणावे

चोराच्या पाठीवर थापा न्याय आंधळा
संन्याशाला फासावरती काय म्हणावे

विद्येचा का खेळ अघोरी रस्ता नाही?
नदी आडवी भवरे फिरती काय म्हणावे

नैतिकता ही कुठे राहिली सांगा आता
पतिव्रतेला बोल लावती काय म्हणावे

सत्ताधारी कसे वागती मला कळेना
अपशब्दांनी दोष काढती काय म्हणावे

मधाळ भाषा समजत नाही फसगत मोठी
केसाने बघ गळा कापती काय म्हणावे

दुनियादारी अशीच असते उलटी सुलटी
गुंडगिरीला सलाम करती काय म्हणावे

३.

काय सांगावे कुणाला बेगडाला मोल येथे
कौतुक्यांचा वाजतो का विकृतीचा ढोल येथे?

ज्ञान नाही आव मोठा दुर्जनांची साथ त्यांना
सज्जनांना मान नाही सत्यवादी फोल येथे

'मी'पणाचा जोर ऐसा शब्द सारे पेटलेले
माणसांच्या काळजाची आटलेली ओल येथे

रोज येथे साचते का बेहिशोबी मालमत्ता
नोटबंदी होत आहे
सर्वकाही गोल येथे

कष्टणारे हात मित्रा
राहती का अर्धपोटी?
ना कळे कोणास ऐसे
दु:ख त्यांचे खोल येथे

सत्य येथे सांगताना
ओठ का बंदिस्त होती?
भामट्यांना टोचती का अंतरीचे बोल येथे?

गर्द काळी रात आहे वादळाशी झुंज आहे
वाट ऐशी चालताना सावरावा तोल येथे

.................................
शांताराम हिवराळे
पिंपरी,पुणे
9922937339

No comments:

Post a Comment