१ .
ठेवुनी समतोल अवघा छान केले
मानवाला तूच प्रज्ञावान केले
ईश्वराचा वास जर हृदयात आहे
मी शरीरालाच देवस्थान केले
लावुनी गोडी अभंगाची मनाला
त्या तुकोबाने मला धनवान केले
अंतरंगी कोण तो संचार करतो
त्या दिशेने मी अता प्रस्थान केले
मी गवसलो ना मला मार्गात माझ्या
पण जगाने शोधुनी गुणगान केले
२.
नेहमी लक्षात ठेवा
माणसे हातात ठेवा
मोठमोठे काम होते
हासणे गालात ठेवा
लाभते सर्वस्व येथे
कर्मनिष्ठा आत ठेवा
जर शिखर गाठायचे तर
नव गती चाकात ठेवा
फायदा नुकसान होवो
गोष्ट या देहात ठेवा
वाद वा संवाद हळवा
नेहमी दोघात ठेवा
जिंकण्याचा मंत्र सोपा
एकमत संघात ठेवा
३.
केस पिकले पण पुरेशी पक्वता नाही
या पुढेही फार काही शक्यता नाही
जे मनी येईल ते ते बोलुनी जातो
बोलल्या शब्दात किंचित सत्यता नाही
भोगुनी साऱ्या सुखाला फस्त केले पण
आतल्या त्या वासनेची तृप्तता नाही
दोन डोळे पण तरीही आंधळा दिसतो
आंधळ्याचे सोंग करतो, जन्मता नाही
खूप आले खूप गेले भोगुनी सत्ता
आजच्या नेत्यात तैसी योग्यता नाही
.................................
जयप्रकाश सोनूरकर
वर्धा
९७६५५४७९४०
खूप मार्मिक व छान रचना....👍
ReplyDelete