तीन गझला : सतीश गुलाबसिंह मालवे

 



१.


ती म्हणाली तेच घडले आमचे

आखलेले डाव फसले आमचे


शस्त्र होते की,नजर होती तिची

कैक योद्धे गार पडले आमचे


भेटली असती सुखाची सावली

पण उन्हाने ध्येय खचले आमचे


लेखणी  तलवार  वाटू  लागली

शब्द  जेव्हा ढाल बनले आमचे


चार खांद्यांची गरज पडली कुठे?

'धड'  कुरुक्षेत्रात  सडले आमचे


चांगले  केलेस तू ,हे ईश्वरा

देह  मातीने बनवले  आमचे


हिंमतीने  साथ  जेव्हा  सोडली

प्राण  मृत्यूने  पळवले  आमचे


राखता आहात काट्यांची निगा

यामुळे तर पुष्प सुकले आमचे


दूर व्हा आम्हा जवळ थांबू नका!

हेच तर  ऐकून  चुकले  आमचे



२.


हसवतोस अन् कधी अचानक रडवतोस तू

विदूषकाची  छान भूमिका  निभवतोस तू


जखम पाहुनी मोहित होऊ नये कुणीही

म्हणून बहुधा त्यावर खपली चढवतोस तू


ज्या मातीला आम्ही केवळ धूळ मानतो

त्या मातीची सुंदर मूर्ती  बनवतोस तू


प्रत्येकाला वेगवेगळा   अनुभव आला

अशा कोणत्या शाळेमध्ये शिकवतोस तू


चित्त कुठेही लागत नाही जेव्हा माझे

आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवतोस तू


आयुष्याची कोरडवाहू  जमीन अमुच्या

तऱ्हेतऱ्हेच्या सुखदुःखाने पिकवतोस तू


'सोन्याहुनही पिवळी किरणे घेउन सूर्या '

किती खुबीने या धरतीला मढवतोस तू


३.


कुणी जाऊन सूर्याला असे म्हणणार आहे का?

तुझ्यासुद्धा बुडाखाली बघू अंधार आहे का?


किती पडलीत भगदाडे मनाच्या जीर्ण भिंतींना

गिलावा शेणमातीने  कुणी करणार आहे का?


खरे म्हणजे जिच्यासाठी मनाचा डोह केला मी

खडे टाकायला येणे तिला जमणार आहे का?


जरीही नाव ओढ्याला समुद्राचे दिले आपण

नदीशी गाठ पडल्यावर टिकू शकणार आहे का?


व्यथेच्या दलदलीमध्ये फसत आहे कशाला मी

मला पाहून कोणाला,कमळ स्मरणार आहे का?


स्वतःची चूक झालेली स्वतःहुन मान्य केल्यावर

अशाने आपला दर्जा कमी होणार आहे का?


सतिशचा यामुळे असतो निरंतर जीव हातावर

इथे जन्मास आल्यावर मरण चुकणार आहे का?


...................................................

सतिश गुलाबसिंह मालवे

मुऱ्हा देवी(अमरावती)

हमु.शिक्रापूर,पुणे

मो.न.9527912625

1 comment:

  1. वाह सर,
    हसवतोस अन् कधी अचानक रडवतोस तू...
    विदुषकाची छान भूमिका निभावतोस तू...
    वाह काय छान मतला आहे...

    ReplyDelete