१.
देत नाही कोणतीही जात ईश्वर
माणसाच्या नांदतो देहात ईश्वर
कोणताही धर्म नाही या भुकेचा
पोट म्हणते भाकरी अन् भात ईश्वर
तो तुझ्या माझ्यात आहे..शोध घे तू
माणसा, शोधू नको साच्यात ईश्वर
नेहमी होते भले त्याचेच केवळ
शोधतो जो आपल्या कर्मात ईश्वर
रक्त आहे लाल माझे अन् तुझेही
मग कशाला बांधतो रंगात ईश्वर
शोध घ्यावा वाटले नाहीच..कारण
राहतो माझ्या सदा हृदयात ईश्वर
कोण म्हणतो देव असतो देवळातच
पाहते मी माय अन् बापात ईश्वर
राहिला नाही कुणी जर सोबतीला
ठेवतो डोक्यावरी मग हात ईश्वर
याचसाठी वाटते आहे निरागस
ठेवते गझले तुझ्या शब्दात ईश्वर
२.
बोलण्याचीही मुभा जर आज नाही
वाचवू आता कशी मी लोकशाही
ते उद्या घर जाळतिल भक्ता तुझेही
आज तू करतोय ज्यांची वाहवाही
धर्म नावाचे अफू देऊन वेड्या
चालली आहे इथे बस हुकुमशाही
फक्त काड्या ठेवते ती जाळण्याला
कोणती माचिस कुठे जळणार नाही
राजकारण फक्त वापरते तुम्हाला
पण तुम्हाला भाकरी देणार नाही
३.
मला नजरेत पाहुन माणसांना वाचता येते
नजर वाचून सुद्धा संयमाने वागता येते
नको अंदाज लावू तू कुणाचा फक्त दिसण्यावर
कुणाला संयमाने आत वादळ पाळता येते
तिला माहीत आहे सागरा.. आहेस खारट तू
नदी होऊन बाईला तरीही वाहता येते
ग्रहांना जोडतो आहे जरी माणूस तंत्राने
कुठे पण माणसांना माणसांशी जोडता येते?
कुणी वाट्टेल ते नाही लिहू शकणार माझ्यावर
मला 'आयुष्य' नावाची वही सांभाळता येते
नदी-माझ्यात इतकी साम्यता दिसते मला कायम
तिलाही वाहता येते, मलाही वाहता येते
No comments:
Post a Comment