तीन गझला : सौ.निशा चौसाळकर


 


१.

तुझ्या माझ्यातले अंतर कधीही वाढले नाही
समांतर चालणे अपुले जराही थांबले नाही.

चमकला काजवा अन् तोल  ढळला का तुझा नाहक
जरी दिसले कधी तारे  वलय मी लांघले नाही

बिछान्यावर पसरल्या पाकळ्या कोणी गुलाबाच्या
फुलाच्या वेदनेने रात्रभर मी झोपले नाही

उकिरड्यावर जरी होतो,बरा होतो म्हणाला तो
तुरुंगाचे जिणे त्याच्या मनाला भावले नाही

तिजोरी काळजाची तू दिली आहेस भरभक्कम
म्हणूनच  वेदनेला मी खुल्यावर सोडले नाही

उन्हाच्या काहिलीमध्ये तुझे मृगजळ नको आहे
तहानेने कुणामागे कधी मी  धावले नाही

किनाऱ्यावर उभे राहून  लाटा मोजतो आहे
तुफानाला भिडावे थेट, त्याला वाटले नाही

२.

राहुनी शहरात मोठ्या, मी कमवते नाव आहे
आब माझा राखणारे,सोडले मी गाव आहे

जर व्यसन जडले तुलाही, अक्षरे कुरवाळण्याचे
लेखनासाठी तुझ्या  केले हृदय मी ताव आहे

जन्मभर दुखणार क्षण पण, ठेवते सांभाळुनी मी
एवढा गंधित, खचित हा,तू दिलेला घाव आहे

बंद झाले मार्ग सारे, एकटी येऊ कशी मी?
आठवांनी काळजाला घातला घेराव आहे

ओढुनी पदरास त्याने भंग केला सभ्यतेचा
रंगला द्यूतात केवळ जीवघेणा डाव आहे

मी कशाला दार उघडू पाहुण्यांसाठी अनाहुत?
अर्धपोटी पोरगे अन् दूध जर अधपाव आहे

तारका लपल्या तरीही, काळजी नाही 'निशे'ला
काजव्यांचा भोवताली, रात्रभर वर्षाव आहे

३.

जुन्या पुराण्या किती तसबिरी मिरवत  बसल्या भिंती
गतकाळाचे वैभव  थाटत सुंदर सजल्या भिंती

कुणी आखल्या रेषा येथे प्रांत पाडले कोणी
भेदाचे बी रुजल्यानंतर  किती उगवल्या भिंती

परस्परांशी हेवेदावे करू लागले भाऊ
रम्य बालपण  स्मरून त्यांचे उदास हसल्या भिंती

गेले वैभव निघून सारे भकास  पडले वाडे
मारत हाका मदतीसाठी खचू लागल्या भिंती

उरात झाली खदखद तेव्हा चिडली धरणी माता
राग पाहुनी  धरतीचा मग  कंप पावल्या भिंती

फिरकत नाही चाकरमानी घर एकाकी पडले
गावाकडल्या  घराघरांच्या रुसून फुगल्या भिंती

होती ज्यांच्या रक्तामध्ये सळसळणारी उर्जा
कागद झाल्या त्यांच्यासाठी कोठडीतल्या भिंती

.................................
सौ.निशा चौसाळकर
अंबाजोगाई
मो.7798095711

No comments:

Post a Comment