१.
कुणीच नसले सोबतीस की घुसमट होते
रोज रोजचे जगणे सुद्धा कटकट होते
एका नंतर लगेच दुसरे तयार असते
स्वप्नांमागे पळता पळता फरफट होते
तरूण होतो तेंव्हा मरणे सोपे वाटे
वाढताच वय मरणाचे भय बळकट होते
स्तुती पचवणे जेंव्हा थोडे अवघड जाते
तेंव्हा मग ही जीभ जराशी उद्धट होते
फक्त बदलता लेबल त्यांनी जरा खुबीने
अन् बाजारी लगेच किंमत दुप्पट होते
सोपे नसते कुणापुढेही हात पसरणे
काय करावे भूक बिचारी हलकट होते
उभा जन्म हे सत्य बिचारे तिथेच अजुनी
खोट्याची बघ किती प्रसिद्धी झटपट होते
जीवनात या नुस्ते सुखही नको मिळाया
हळूहळू चव त्याचीही मग कडवट होते
२.
मनास या हवे जसे तसे कधी घडेल का ?
खरेच मी कधीतरी सुखास आवडेल का ?
कशास धावतो असा उगाच रोज रोज मी
निदान प्रश्न माणसास एवढा पडेल का ?
सतावती तुझेच भास नेहमी सभोवती
कधीतरी तुला असाच रोग हा जडेल का ?
जुनेच घाव हे तुझे अजून सोसतोय ना
नवीन स्वप्न पाहणे लगेच परवडेल का ?
तुझ्याविना इथे किती उदास रात्र भासते
छतावरी तुझ्या सुरेख चांदणे पडेल का ?
पुन्हा पुन्हा व्यथा किती जिवास घोर लावते
उपाय यावरी कधी कुणास सापडेल का ?
३.
त्यांचेच ऐकण्याचा झाला सराव आता
मज बोलण्यास येथे उरला न वाव आता
काट्यात चालण्याची होती सवय परंतू
केला तुझ्या फुलांनी नाजूक घाव आता
ते बांधती दुरूनी अंदाज वादळांचे
बिनधास्त सोडली मी पाण्यात नाव आता
प्रत्येक गोष्ट त्यांनी विक्रीस काढलेली
करतील भावनांचा तेही लिलाव आता
साऱ्याच योजनांना खाण्यात ते मुरब्बी
खाऊन संपले की मग काव काव आता
खात्री पराभवाची होताक्षणीच त्यांना
उधळून लावती ते सगळाच डाव आता
पटलेच ना कधीही या नाटकी जगाशी
नडतो जिथे तिथे हा माझा स्वभाव आता
मनसोक्त हासण्याची का संपली युगे ही
प्रत्येक चेहऱ्यावर दिसतो तणाव आता
...................................................
सचिन साताळकर
एरंडगाव ता. येवला जि. नाशिक
मो.7588616163
छान 👌
ReplyDeleteवाह.. सचिनजी 👌👌👌💐💐💐
ReplyDelete