१.
भांडण केवळ कारण आहे
मौन, मनाचे रक्षण आहे
बाप वाटतो खडूस माझा
मनात त्याच्या श्रावण आहे
शेतकरी मी सुखात नसतो
सदैव पिकाची राखण आहे
कांद्यालाही भाव मिळेना
उदास माझा साजण आहे
ताटामध्ये नसे भाकरी
स्वप्नामध्ये घावण आहे
बैलच विकले पैशांसाठी
रिकामीच ही दावण आहे
पिऊन पाणी झोपा आता
मनात करते जेवण आहे
२.
विश्वासाचा खचला पाया
तिथेच नाते गेले वाया
संसाराचे गाणे गाया
घरात भक्कम हव्याच बाया
आपुलकीचे अत्तर लावा
उगी कशाला पडता पाया
रांगोळीने सजल्यावरती
अंगण लागे रोज हसाया
शेतमाल शेतातच सडला
सर्व मेहनत गेली वाया
शेतकऱ्यांचे अवघड जीवन
कर्जापायी मेला राया
नकाच तोडू झाड कोणते
झाड लावते निव्वळ माया
३.
व्यथेने अवस्था मनाची रडे
दिसावे कुणाला मनाचे तडे
हवी तू मला सात जन्मी जरी
वडाला कशाला तुझे साकडे
जगाने पहावे हसू आपले
हवा हात हाती हवे ते घडे
सुखाने जगावे बरे आपले
नको ती हवेली, बरे झोपडे
हसावे जरा हे कुठे वाटते
सुखाच्या क्षणांशी तुझे वाकडे
हवे ते मिळावे जिवंतच मला
उद्या चंदनाची नको लाकडे
कशी सांग वाचू अता माणसे
शिकवले कुणी ना मला ते धडे
व्वा. छान आहेत तीनही गझला.
ReplyDelete