तीन गझला : सिराज शिकलगार

 



१.

पोटात पोसण्याचे कौशल्य काय असते
सांगेल माउली ती वात्सल्य काय असते

इतिहास वाचल्यावर कर्णास त्या विचारा
दानात जीवनाचे साफल्य काय असते

सावज हताश आहे जाळ्यात पारध्याच्या
डोळ्यात बघ तयाच्या कैवल्य काय असते

वृद्धाश्रमात इतकी मौनात माणसे का
हृदयात बोचणारे ते शल्य काय असते

गर्भात भ्रूणहत्या केली नराधमांनी
त्यांना कसे कळावे मांगल्य काय असते

व्यसनात वित्त सरले नाती पसार झाली
तेव्हा कुठे समजले वैफल्य काय असते

सांगा कुणीतरी त्या शहरातल्या कवींना
गझलेत शुद्धतेचे प्राबल्य काय असते

२.

मौनात लाख येथे वाचाळ एकटा मी
गर्दीत होयबांच्या नाठाळ एकटा मी

प्रतिकार टाळला मी नाती समोर दिसता
सुखरूप राहिले ते घायाळ एकटा मी

आघात संकटांचे झालेत ओळखीचे
आव्हान पेलणारा आभाळ एकटा मी

गुपचूप वार करणे आहे पसंत त्यांना
माझे उघड इरादे सायाळ एकटा मी

पडल्यात अंगवळणी हुलकावण्या यशाच्या
खोदीन त्या यशास्तव पाताळ एकटा मी

३.

बोल बोबडे आणिक वरती, संघर्षाची भाषा
कर्म तोकडे तरी तुझी का, साफल्याची भाषा

चिंता हटली चार पिढ्यांची, इतकी जमली माया
दीनासाठी कशास खोटी, औदार्याची भाषा

परक्यासाठी नकोच गाळू, हे मगरीचे अश्रू
विस्थापित ते मायबाप अन्, सौजन्याची भाषा

निसर्ग सुद्धा हताश झाला, किती तोडली झाडी
पक्ष्यांनाही तुझी कळाली, कैवल्याची भाषा

सखे तुझी ही आदत मजला, किती जाचते सांगू
पाणउतारा आधी नंतर, वैषम्याची भाषा

बंधन नाही विनाअटीची, तुम्ही जोडता नाती
मजा चाखता आणिक करता, संस्काराची भाषा

करार कसले धूळफेक ती, जगास कळते सारे
अण्वस्त्रांना कळून चुकली, सौहार्दाची भाषा

...............................
सिराज शिकलगार
9890597855

1 comment: