१.
प्रेम होते आपले, मी जीव होता लावला
मांडला संसार माझ्या हातुनी का निसटला
झाड प्रेमाचे बहरले, बांधले घरटे वरी
पाठ तू फिरवून गेली, प्रेम पान्हा आटला
प्रीत करताना शपथ जी घेतली तू मोडली
मीच आई होउनी संसार हा सांभाळला
लाट येते ना समुद्रावर, उफाळुन धावते
सोबतीसाठी किनारा आपला तू मानला
घेउनी आधार 'शोभा ' चा पुढे तू धावला
चोरुनी तू पाहताना प्राण माझा आटला
२.
रोज माझे श्वास तू माळून घ्यावे
हार बाहूंचे गळी घालून घ्यावे
तू न मी हे दोन नाही एक आहो
पाहणाऱ्यांनी खरे समजून घ्यावे
मित्र अन् मैत्रीण हे श्रीमंत नाते
हे मनाचे बंध पडताळून घ्यावे
मासळी पाण्यात आनंदी तरंगे
वाटते मीही तसे पोहून घ्यावे
मी तुला अंगावरी घ्यावे लपेटुन
चांदण्यांचे वस्त्र तू घालून घ्यावे
प्रेम माझे अंबराचा शुक्र तारा
ज्यास शंका वाटते निरखून घ्यावे
दूर मी जाणार नाही शब्द 'शोभा '
झूल होइन फक्त सांभाळून घ्यावे
३.
शब्द स्नेहींनो उगा रागावणे सोडून द्या
एकमेकांच्या चुकांवर बोलणे सोडून द्या
अक्षरांना मान आहे आपल्या कामामुळे
अर्थवाही शब्द द्या, घोंघावणे सोडून द्या
मी तुम्हाला वाचले नाही तरी खोटी स्तुती
आपल्यांना हार, शाली घालणे सोडून द्या
शुभ्र वसने, हंस आरुढ ज्ञानदेव आपली
देह पायी ठेवला कातावणे सोडून द्या
शारदापूजा स्वरांनी बांधली आहे खरी
शांततेने सूर लावा, धावणे सोडून द्या
धीर अन् गंभीर 'शोभा ' माणसे शोधायची
काम करताना उगाचच तापणे सोडून द्या
.................................
शोभा तेलंग इन्दूर म. प्र.
भ्रमणध्वनी 7724006713
No comments:
Post a Comment