'ग़ज़ल का दर्द, ग़ज़ल का गुदाज लाया हूँ
तिरे लिये तिरी तस्वीरे- नाज लाया हूँ'
-जमीलुद्दीन अली या शेरात म्हणतात की, कधी नदीच्या काठावर शांती असते, तर कधी वीज आणि वादळ असते आणि हेच तर गझलेचे गुणविशेष आहेत. गझलेचा दृष्टीच्या अर्थाशी संबंध असतो. ती सादरीकरणातून काव्याशी आपले नाते बनवत असते. तिच्यात लयबद्धता असते. त्यामुळे तिचा वाचकांवर प्रभाव पडतो. तरल मनाची गझल आपल्यावर नेहमीच छाप पाडत असते. असाच तरल गझलेचा 'संगीत श्रावणाचे' हा गझलकार कमलाकर राऊत यांचा गझलसंग्रह ग्रंथाली मुंबई यांनी प्रकाशित केला आहे. कमलाकर राऊत म्हणतात -
'संगीत श्रावणाचे संगे तुझ्याच गातो
झेलीत गार धारा या पावसात न्हातो '
'संगीत श्रावणाचे' हा गझलसंग्रह छंदबद्ध आणि वृत्तबद्ध अशा दोन्ही प्रकारांतील १३० गझलांनी सजलेला आहे. कमलाकर राऊत निसर्ग, प्रेम, समाज, देशप्रेम यात गढलेला कवी असून, शब्दांत रुजलेला आहे. त्यामुळे तो आपल्याशी आत्ममग्नतेने आणि तितक्याच तरलतेने संवाद साधतोय. त्यामुळे त्याच्या गझलांमध्ये एक वेगळेपणा जाणवतो.
'गुंत्यात गुंतण्याचा आता हव्यास नाही
झाल्या खऱ्या मनीषा खोटाच भास नाही '
या शेरात ते म्हणतात की, आता ते स्वतंत्र असून त्यांना कोणत्याही माणसांत, प्रेमात किंवा गटात गुंतायचे नाहीय. सर्वांच्या सोबतीला राहणे त्यांना पसंत असेल; तरी त्यांचा त्यांच्यावर परिणाम झालेला नाही. म्हणजेच त्यांच्या गझलांवर कुणाचा प्रभाव पडलेला नाही. ती स्वतंत्र आशय आणि विषय घेऊन येत आहे. म्हणूनच तिच्यात वेगळेपणा आहे.
'माझा मलाच मीही आता कसा कळावा
त्यांच्या मनातला 'मी' भ्रमातही जडावा '
कवी नेहमी स्वतःच्या किंवा इतर सर्वसामान्य माणसांच्या पुढचे पाहू शकतो. तरी कधीकधी अशी अवस्था असते की, तो स्वतःच स्वतःला कळलेला नसतो. किंबहुना तो विचार करतो की मी स्वतःलाच कळलो नाही. तर इतरांच्या मनात माझ्याबद्दल जे चाललेय ते सगळे भ्रम आहेत. हे कमलाकर राऊत या गझलेतून प्रातिनिधिकतेने दर्शवतात.
'प्रहार झेलून मी आसवांत न्हातो
संगीत पावसाचे मी पावसात गातो '
आयुष्यातील वेदना किंवा प्रहारातून कोणताच लेखक किंवा कवी सुटलेला नाही. त्या वेदनेतूनच चांगल्या साहित्याची निर्मिती होते; हे यातून जाणवते. असे प्रहार, समस्या, कठीण प्रसंग आणि वेदना झेलून त्यांना तोंड देत देत तो श्रावणातील पावसाचे म्हणजेच सुख-दुःखाचे गीत गात आहे.
'मनी नाचतो हा जरी मोर आहे
कसा जीवनाला तरी घोर आहे '
या भुजंगप्रयात वृत्तातील गझलेत ते म्हणतात, मनात आनंदाचे मोर नाचत असले; तरी प्रत्येकाच्या जीवनाला कोणता ना कोणता तरी घोर लागून राहिलेला असतो. तेव्हा जगी सर्व सुखी असा कोण आहे? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. राऊत यांच्या 'मनी नाचतो ' , ' मनी भाव जेव्हा ', ' मला वादळाचे' , ' तुला काय ठावे ' या भुजंगप्रयात वृत्तातील गझला आपल्याला भावून जातात.
'गाणे नव्या उषेचे येऊन थांबलेले
भेटीविना अशी तू राहू नकोस आता '
आनंदकंद वृत्तातील या गझलेत प्रेमभावना दिसून येते. ती म्हणजे आताशा कुठे सुंदर अशा रात्रीचे गीत लागले आहे. तशी ती रात्र उमलत असताना आता तू भेटल्याशिवाय राहणे योग्य नाही. तर तू भेटणे अत्यंत गरजेचे आहे ही व्याकुळता कवी व्यक्त करत आहे. अशा प्रेमाबरोबरच ते समाजाच्याही वेदना मांडतात हे आपल्याला त्यांच्या 'रिक्त झोळी' या गझलेत दिसून येते. तर 'जो-तो कवेत घेता ' या गझलेत ' सारेजण कसे क्षणाचे सोबती असतात. परंतु ते निघून गेल्यावर सगळा माहोल कसा भकास होतो याची जाणीव आपल्याला होते.
'आता कुठे जरासे हे लागले कळाया
डोळे तुझ्याकडे का हे लागले वळाया '
'आता जरा जराशी श्वासात साठते तू
ओठावरील नव्याने शब्दात दाटते तू '
'पाऊस पेटवी हा माझ्या तनामनाला
गोंजारतो तरी मी माझ्याच श्रावणाला '
असे शेर त्यांच्या प्रेमाच्या तरल गझलेत येतात. तेव्हा आपणही हरखून जातो,त्यात हरवून जातो. संपूर्ण रात गेली या गझलेत कमलाकर राऊत म्हणतात:
'मला वायदा तू दिला चांदण्याचा
तुझा कायदा हा सदा भांडण्याचा '
या अतृप्त प्रेमाच्या गझलेत प्रेयसीने प्रियकराला वायदा केलाय. पण तिनेच तो मोडण्यासाठी कायम भांडण्याचाच सहारा घेतला आहे. असे हे प्रसंग बरेच जणांच्या जीवनात येतात हे सत्य आहे.
जीवनाला पेलताना यातनांचा भार झाला
वेदनांनी वेचली जी त्या फुलांचा हार झाला
यात कवीला जीवनात जगताना बऱ्याच यातनांना सामोरे जावे लागले आहे. तसे जीवन जगताना कुणालाच सहज सुखाने जगता येत नाही. तर या जगात प्रत्येकाला काहीना काही यातना आणि वेदना असतातच. पण त्याच वेदना आपण हसत खेळत झेलल्या तर आपल्याला जगणे सुसह्य होते. याची जाणीव यातून गझलकार आपल्याला करून देतो आहे.
व्यसनी माणसांच्या जीवनाची आणि वेदनेची चित्रकथा मांडताना गझलकार म्हणतो -
'रोज पिणे मी सुरेला हा नव्हे का मान तिचा
मी जरी घेतो खुशीने, वेदनेचा घोट आहे '
यात ते व्यसनाबद्दल म्हणतात की, कोणतेही व्यसन करणे म्हणजे त्या व्यसनाचा मान असतो. पण ते व्यसन नसून तो आपल्याला झालेल्या वेदनेचा घोट असतो. म्हणजेच वेदना हेच आपले व्यसन असून त्यालाच आपण गिळंकृत केले तर जीवनात सहज जगता येईल. असा विचार ते मांडून जातात.
'माझ्यात रोज मीरा माझ्यात रोज राधा
माझ्यात जानकीला रानात शोधिते मी '
स्त्रीच्या भूमिकेतील गझलेत ते म्हणतात की, मीरा काय? राधा काय? किंवा जानकी म्हणजे सीता काय? या सगळ्या निरपेक्ष, निस्वार्थी प्रेमाने समर्पित आहेत. त्यानाच मी माझ्यात निस्वार्थीपणे शोधतोय. असेच प्रेमाच्या बाबतीत माणसाने असावे. पण या जगतात ते शक्य नसते.
आकाशात मेघ येतात आणि हुलकावणी देऊन निघून जातात. ते खाली भूतलावर वळूनही पाहत नाहीत. त्यामुळे शेतात उगवलेले पीकही जळायला लागते. या वेदनेची तीव्रता इतकी भयाण असते की शेताबरोबरच शेतकऱ्याचाही जीव जळायला लागतो तेव्हा कवी लिहितो-
'ते मेघ पावसाळी आता वळून गेले
शेतात पीक सारे आता जळून गेले '
कमलाकर राऊत हा निसर्गात रमलेला कवी असल्याने त्यांच्या गझलेत निसर्ग सहजतेने डोकावतो. तेव्हा तो तेवढ्याच सूक्ष्मतेने पशुपक्षी, वनस्पतींचे हावभाव रेखाटतो.
'पाखरांना नाचताना पाहिले
लोचनांना वाहताना पाहिले
चांदणे ही मूक झाले भूवरी काजव्याला खेळताना पाहिले '
'रानात केवड्याच्या गंधास भाव होता
तेथेच राहण्याचा नागास वाव होता '
या तरल गझलांमध्ये त्यांना पाखरेही नाचताना आणि काजवेही खेळताना दिसताहेत. तसेच दुसऱ्या शेरामध्ये रानात जेथे केवड्याच्या सुगंध पसरलेला असतो अशा सुंदर वातावरणात विषारी नागही वावरत असतो. एवढया सूक्ष्मतेने त्यांनी निसर्गाचा वेध घेतला आहे . यातून जिथे चांगले वातावरण आणि चांगली माणसे असतात तिथं काही दुष्ट माणसेही वावरत असतात असे दिसून येते . माणसांच्याबाबत ते लिहितात -
'घेऊन सोंग वेडे कैफात हिंडती जे
त्यांना कसे कळावे होते इथेच माती '
माणूस नेहमी मोठेपणाच्या कैफात विविध सोंगं घेत फिरत असतो ; पण हे सगळे तात्पुरते असते. कारण शेवटी सगळ्यांना याच मातीत मिसळायचे असते. तिच्यासाठी कुणीही मोठा नसतो. सगळेच सारखे असतात असे तत्त्वज्ञान कवी या दोन ओळीत सांगून जातो.
ओठावरून माझ्या संगीत ओघळावे
हे गीत प्राक्तनाचे ओल्या सुरात गावे '
कमलाकर राऊत कवितांपेक्षा लय, ताल , छंद असलेल्या गीतात आणि गाण्यात जास्त रमतात. म्हणूनच ते या शेरात माझ्या ओठांवर सारखे गीत , संगीत यावे आणि माझ्या प्राक्तनाचे गीते होऊन मी ती सुरात आळवावी असे म्हणतात.
त्यांच्या आनंदकंद वृत्तातील गझलेत ते लिहितात -
'आता नको विचारू माझी कधी खुशाली
डोळ्यात आसवांना केले असे हवाली '
अशा या शेरांमधून गझल लेखनावर त्यांचं प्रभुत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. तसं पाहिलं तर गझल हा एक दृष्टीचा सोहळा आहे. तिथे फक्त डोळे पुरेसे नसतात. तिथे दृष्टी हवी आणि म्हणूनच एक परिपूर्ण शेर तो वाचणाऱ्या प्रत्येकाला नवी दृष्टी देतो. तसे खालील शेरांमध्ये कवी म्हणतो की,
'तुझ्या स्वागता या दिशा वाकल्या या
किती काळजाला झळा लागल्या या
तुझी पावले ती जिथे काल पडली
खुणा मोहराया तिथे लागल्या या '
अशाप्रकारे त्यांना प्रेयसीच्या स्वागतासाठी दिशाही वाकल्याचे जाणवते. एवढेच नव्हे तर; तिची पावले जिथे पडली होती तिथे आता त्या पवलांच्या खुणांना अंकूर फुटल्याचे जाणवतेय. तेव्हा या गझला आपल्याला एका सूक्ष्म अनुभूतीच्या उंचीवर गेल्याचे दिसून येते. विरह, तरल,नाजूक भावना या गझलेत त्यांनी सहजतेने टिपल्या आहेत.
'जगातून आता जरी जात होता
अखेरीस त्याचा रिता हात होता '
माणसाला मृत्यू अटळ हा आहे. तो जाताना बरोबर काहीही घेऊन जात नाही; हे वैश्विक सत्य सोप्या शब्दात त्यांनी मांडले आहे. विविध प्रकारच्या गझलांबरोबर यात काही प्रासंगिक गझला आहेत. त्यात कोरोना काळातील काही गझला आहेत. कोरोनात मृत झालेल्यांचे आपल्याला दर्शनही घेता येत नाही. त्यातून या कालावधीतील माणसाचे कोरोनाने केलेले हाल, दैन्य, दुर्दैव आणि दहशत याचे चित्रण खालील शेरांतून आपल्या डोळ्यासमोर येते.
'जातात या जगाला सोडून रोज थोडे
त्या झाकल्या मुखाला पाहू तरी कसा मी '
'वाढलेल्या संकटाला टाळवेना टाळता
बोल सारे ते फुकाचे बोलताना पाहिले '
'भोवताली बातम्यांची वर्तुळे ही
रोज पाने फाटलेली चाळतो मी '
फक्त प्रेम , विरह , देशप्रेम , भावना अशा गझलाच नव्हे ; तर सामाजिक, मानवी मूल्ये, वेदना आणि संवेदना असलेली सामाजिक गझलही तेवढ्याच ताकदीने कमलाकर राऊत लिहून जातात. ज्यात आजच्या जीवन जगण्याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. भारतीय संस्कृती आणि चेतनेची जाणीव त्यांच्या गझलांमधे आहे. तसेच आतंकवादाच्या भयावहतेचा आवाज या गझलेने टिपला आहे.
प्रेमाची विविध रूपे, स्नेह, ममता , दया , अनुराग, मातृत्व, ईश्वरभक्ती, विश्वबंधुत्व, सुख-शांती यांचे संदर्भ यात आले आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक विसंगती आणि विद्रूपता, भ्रष्टाचार, अत्याचार याबाबत आक्रोश आणि अधःपतन झालेल्या नैतिक मूल्यांना यात समाविष्ट केले आहे.
झिजविलेले उंबरे, घरांची लक्तरे, पावलांचे ठसे, बुडती घरे, मनातला पती, शर्यतीतला घोडा,भंगलेल्या मूर्तीची पूजा करून देवळात मांडलेला बाजार, तापलेल्या वाळूवरची पावले, सागराची वाट, धुंद डोळे, गोठलेले नदीचे किनारे, पावलांच्या खुणा, पेटवणारा पाऊस, कोंडलेला श्वास, मिटणारी लहरीची पाने, गोठलेली आसवे, नादान माणूस, रस्त्यातले दिवे, हातातले दिवे यातले वेगळेपण, बेहोश काजवे, फुलांशी नाते, गोठलेले स्वप्ने, जीवघेण्या हाका, बातम्यांची वर्तुळे, मीपणाची मशाल, बातम्यांची वर्तुळे, वाढलेली संकटे, सावल्यांचे स्पर्श, संकटाचा वात, आरशाच्या तडा, वेदनांचे हार, बेगड्यांचे रान, पाकळ्यांचा शृंगार ,आसवांचा सडा, अशा अनेक विविधांगी प्रतिमा त्यांच्या गझलेत येतात . तसेच सूर्य, चंद्रकोर, मेघ, आभाळ, नाव ( होडी), मोर, झुंबरे, वेल, ज्योत, सागर अशी वेगवेगळी प्रतीके त्यांच्या गझलांमध्ये आशयघनतेने येतात. आणि मूल्य वाढवितात. अशी ही त्यांची ताल, लय आणि छंद घेऊन येणारी गझल वाचतांना आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते, एवढी तिच्यात सहजता आहे. कमीत कमी शब्दांत परंतु ,नियमांच्या अधीन राहून मोठ-मोठ्या गोष्टीही ती गंभीरतापूर्वक आपल्यासमोर पेश करते. यातच गझलेची सफलता दिसून येते. या गझला आपल्याला नक्कीच आवडतील.
................................................. गझलसंग्रह : संगीत श्रावणाचे
प्रकाशक : ग्रंथाली ,मुंबई
पृष्ठे : १५२
मूल्य : ₹ २५० /-
...................................................
No comments:
Post a Comment