तीन गझला : राहुल कुलकर्णी

 



१.


आपला होतो किती वापर बघू 

आपला ठरतो कितीसा दर बघू


पाहिजे आहे तुला सत्ताच तर ..

'सोड त्याचे बोट माझे धर बघू'


पाहिले  अंतर  जसे  दोघांतले

त्याच दोघांतील  सत्तांतर बघू 


बंगले  त्यांचे बदलतिल रोजचे 

आपले गळके अगोदर घर बघू


कोण लोणी चाखतो पाहूच अन्

कोण करतो त्यात हस्तांतर बघू


आजवर त्यांची गरीबी पाहिली

शेवटी जंगम बघू, स्थावर बघू


होत आहे आज स्थित्यंतर इथे

जन्मभर  त्याचेच प्रत्यंतर बघू


एवढ्या लवकर कुठे समजायचे

कोण पडतो एकटा,नंतर बघू 


बांधुनी  डोळ्यांवरी  पट्टी  पुढे

आपला खालावलेला स्तर बघू


२.


उगा जातील कुस्करल्या, सुगंधी व्हायच्या आधी

कळ्या नाजूक सांभाळा उन्हे उमलायच्या आधी


तिला श्रद्धांजली वाहायला आलास मारुन, पण

तिचा आकांतही आठव फुले उधळायच्या आधी


पुढे  वाटेवरी  गोठून बसतिल जन्मभर नजरा

नको पाहू,नको मागे वळू  तू जायच्या आधी


तसे  तर  चांगले  झाले,  दुरावा  साधला  गेला ...

कुणी पर्याय अपुल्याला तसा सुचवायच्या आधी


तुझ्या एकाच श्लेषावर उभे आयुष्य जपले, की, 

मला तू आठवत असते मला विसरायच्या आधी 


स्वतःच्या सांत्वनासाठी खरी शोकांतिका असु दे 

तुझ्या नजरेतुनी नजरा तुझ्या उतरायच्या आधी


सरी बरसायच्या आधी, 'मिठी  होताच दोघांची'

अताशा बरसतो आपण, सरी बरसायच्या आधी


३.


स्वप्न म्हणजे सत्य नाही हे कळाया लागते

मध्यरात्री  पापणी  मग थरथराया  लागते


चांगला  मानून  घेऊ जन्मलो आहोत तर

'जन्म वाइट' हे कळाया जर मराया लागते 


आपली कादंबरी नसतेच गुलदस्त्यात पण

आपल्या आपण घडीला उलगडाया लागते


ऐकता  येते  कुणाच्याही  मनाची  शांतता

फक्त कानाच्या मनाला मन असाया लागते


या जगाच्या पिंजऱ्याचा सापळा समजून घे

अन्यथा या पिंजऱ्याला जग म्हणाया लागते


वाटते अगदी भयंकर ही  अवस्थाही  मला

नेणती अल्लड कळी जेव्हा फुलाया लागते


फक्त बापाचीच ओली पापणी पुरते तिला 

काय लेकीला बिचाऱ्या हिरमुसाया लागते


................................

राहुल नंदकिशोर कुलकर्णी,

देवपूर, धुळे

2 comments: