तीन गझला : सविता बन्सोड

 





१.


नाजूक पापणीला भिजवून रोज जाते

ही याद का कळेना दुखवून रोज जाते


पुसल्यात कैकदा मी खाणाखुणा तिच्या पण

परतून काळजाला खिजवून रोज जाते


टाळून पाहिले मी झटकून पाहिले मी

येते तरी मनाला रिझवून रोज जाते


बेभान फार होता हे दुःख अंतरीचे

एकांत सागरी मज बुडवून रोज जाते


रेशीम बंधनाचे नाते तिचे नि माझे

धागे बड्या खुबीने जुळवून रोज जाते


२.


तुझ्या माझ्यात आलेले कुळांतर सारण्यासाठी

पुढे पाऊल घे थोडे समांतर आणण्यासाठी


युगांची कालचक्रेही अशी व्हावीत हतबल की 

पुन्हा घ्यावी दखल त्यांनी युगांतर चाळण्यासाठी


मुक्या जीवास हक्काचे परत द्यावेत जल जंगल

दिशांमधले तळपणारे स्थलांतर रोखण्यासाठी


जरी आत्ताच आलेले मला अनुभव कडू होते

उचलले मी तरी हिस्से क्षणांतर टाळण्यासाठी


तुझे जगणे तुझे हसणे, असावे सत्य, सुंदरसे

स्वभावाला तुझ्या जप तू अवांतर चालण्यासाठी


३.


होती मनात माझ्या राखून एक इच्छा

अस्तित्व निर्मिण्याची दाबून एक इच्छा


करते कितीक यत्ने डांबून ठेवण्याचे

सूर्यापरी उगवते आतून एक इच्छा


वाटे मनास जेव्हा जगतेय मी कशाला

देण्या जवाब येते धावून एक इच्छा


कष्टाविनाच जीवन असते सदा निरर्थक

घ्यावी म्हणून हृदयी पाळून एक इच्छा


देते क्षणाक्षणाला आव्हान निरनिराळे

भरते मनात आशा जागून एक इच्छा


1 comment:

  1. वाह ताई...
    सुर्यापरी उगवते आतून एक इच्छा...
    कुळांतर आणि समांतर खूपच छान मतला ताई...👌👌👌

    ReplyDelete