१.
नेस्तनाबूत व्हायच्या आधी
भेट,मी भूत व्हायच्या आधी
दे सुपारी खुना-वधासाठी
मी सरळसूत व्हायच्या आधी
मुंबई कर...फिरूबिरू म्हणतो
जीव ताबूत व्हायच्या आधी
फट म्हणे तोच वृद्ध झालो की
रात जागूत व्हायच्या आधी
अजनबी हो पुन्हा...नको होउस
मी अनाहूत व्हायच्या आधी
पूर्ण पाहून घ्यायचे आहे
विश्व काबूत व्हायच्या आधी
ठाम आहे विजय म्हणालेलो
मी पराभूत व्हायच्या आधी
जन्म कैलासचा नको होता
फार खेडूत व्हायच्या आधी
२.
या नभाच्या वर कुठे आहे
पावसाची सर कुठे आहे
वाढली थंडी कडाक्याची
फाटकी चादर कुठे आहे
शांत कोकिळ राहिला आहे
दरवळत मोहर कुठे आहे
वाढला मधुमेह दुनियेचा
पण मुखी साखर कुठे आहे
म्हणवितो कैलासराणा पण
चंद्र डोईवर कुठे आहे
३.
सभोवताली हवा विषारी आहे
प्राण उरातिल फक्त प्रभारी आहे
वार आपला बोथट होतो हल्ली
अन तिकडे समशेर दुधारी आहे
नशीब माझे पुण्यात होते बहुधा
आयुष्याला झोप दुपारी आहे
पान,काथ,तंबाखू,गुटखा जमले
मला मारण्यायोग्य सुपारी आहे
जगणे तर कोलांटउड्यांतच गेले
मी माकड आयुष्य मदारी आहे
कशामुळे 'कैलास ' उकडते आहे
स्मशानात पसरली पथारी आहे
No comments:
Post a Comment