१.
बदलत गेले तुझे निसर्गा आचरण कसे?
मेघांनाही आले आहे वांझपण कसे?
आई होती तोवर होतो लहानगा मी
आई गेली आणिक सरले बालपण कसे?
जिम्मेदारी कळली नाही बाप असेतो
बापानंतर आले इतके प्रौढपण कसे?
अर्धांगीच्या आधाराने हयात जगलो
तिच्यापुढे मग मिरवू माझे थोरपण कसे?
अंत्यविधीला कोणाच्या जो कधी न गेला
खांदा द्याया त्यास मिळावे चारजण कसे?
बाप मुलांचा झाला तरिही प्रश्नच पडतो
गेले नाही अद्याप तुझे पोरपण कसे?
विचार थोडे तुझ्यातल्या त्या हळव्या स्त्रीला
झाले माझ्या आयुष्याचे वाळवण कसे?
ठरले माझ्या मित्रासंगे लग्न तुझे मग
सांग मला मी तुम्हास द्यावे केळवण कसे?
वेडा म्हणतो विश्वच सारे वेडे आहे
म्हणण्याने त्या ठरतिल वेडे सर्वजण कसे?
२.
स्वप्नात रोज येते ते झाड भाकरीचे
हातास लागती ना पण पाड भाकरीचे
का रे दिलीस देवा पोटात भूक इतकी?
पोटास पाडले का भगदाड भाकरीचे?
खाऊन दगड-माती वाटे अता जगावे
हल्ले किती भुकेवर हे भ्याड,भाकरीचे?
कोणी दिला असावा बहुमान भाकरीला?
का प्रश्न रोज पडती धिप्पाड,भाकरीचे?
का सोडले असावे ईमान भाकरीने?
की बाटले म्हणावे मग हाड भाकरीचे?
पर्याय भाकरीला नाही जगात कोठे
झाले म्हणून भलते त्या लाड भाकरीचे
नामी उपाय आता सांगून टाक देवा
कोणी कसे भरावे गर्दाड भाकरीचे?
वस्तीत वंचितांच्या आक्रोश ऐकला मी
डोळ्यात पाहिले त्या आखाड भाकरीचे
होईल तृप्त केव्हा सारी क्षुदा जगाची?
तू लाव एक ऐसे मग झाड भाकरीचे
३.
कुठे कुणाला काही कळते?
सुक्याबरोबर ओले जळते
किती लागते पोटाला ह्या?
दळण रोजचे दुनिया दळते
दिला मुलामा प्रेमाचा तू
जखम तरीही का भळभळते?
निरोप कळतो तिला मनाचा
जाताना ती मागे वळते
किती ठरवतो विसरायाचे
तरी आठवण तिचीच छळते
आवरतो मी मनास चंचल
तिला पाहता इमान ढळते
मृगजळ-बाधा मनास झाली
मी मागे, ती पुढेच पळते
................................
©चंद्रकांत धस
निगडी,पुणे
मो.९९७०४५२५२५
निरोप कळतो तिला मनाचा...हा शेर आवडला. - केदार पाटणकर
ReplyDeleteकेदारजी मनःपूर्वक धन्यवाद!
ReplyDeleteतिन्ही गझला खूप सुंदर आहेत!
ReplyDelete