तीन गझला : अलका देशमुख

 



१.


मला ठेवायची नाही तुझी ती याद आता 

जुने दुखणे नको अन् वेदनांची ब्याद आता


असा झाकून जखमांना मुलामा लावताना

कुठे घेऊन जाऊ मीच ती फिर्याद आता


तुला आहेत वादांचे जुन्या त्या लाड मोठे

उगा का भांडतो उकरून उपरे वाद आता


कधी वाचून घे रे आठवांचे  बाड वेड्या 

पुरे झाला अबोला,सोड, दे ना साद आता


कसा निष्ठूर झाला एवढा प्रेमात होता

कुठे मागू कळेना न्याय आणि दाद आता


२.


फाटली झोळी किती ते  काय सांगू?

सांडल्या ओळी किती ते काय सांगू?


काळजाच्या वेदना वाहून गेल्या 

दाटली चोळी किती ते काय सांगू?


फाटक्या चिंधीस जपले आजवर मी

राहिली भोळी किती ते काय सांगू ?


मोडल्या कित्येक शपथा घेतलेल्या

भाजली पोळी किती ते काय सांगू?


मोह झाला त्या क्षणी अडकून पडता

भेटले कोळी किती ते काय सांगू?


सावलीने सावलीला सोडल्यावर 

पेटली होळी किती ते काय सांगू?


३.


एकेक शब्द त्याचा सोन्यात तोलते ती 

वेडी कितीक माया केसात पेरते ती


कौतूक हे सुखाच्या  एकाच त्या पळाचे 

क्षण रोज आठवांचे शून्यात कोरते ती


अप्रूप केवढे ते त्याच्या जरा  यशाचे

सगळ्यांस सांगताना तोऱ्यात बोलते ती


ठेवू कुठे कळेना ओसंडत्या सुखाला

मग रेघ काजळाची डोळ्यात  ओढते ती


वाटे सुने सुनेसे घरटे तिचेच आता

पण पाखरास दाणे भांड्यात ओतते ती


No comments:

Post a Comment