तीन गझला : सौ. दिपाली कुलकर्णी

 



१.


केवढी दाटून आली आठवण

आजही आतून आली  आठवण


मी निवारा द्यायचा नाही तिला का?

घर जुने सोडून आली आठवण


हात झिडकारू कसा सांगा तिचा 

आपले समजून आली आठवण


मैल ओलांडत मला भेटायला

केवढी लांबून आली आठवण


जायचे नाही म्हणे वापस तिला 

शक्यता लांघून आली आठवण


आजही मी दूर नेउन सोडले

आजही परतून आली आठवण


लागली उचकी अशी जोरात का?

का तुला भेटून आली आठवण


राहते माझ्यासवे,माझ्यामधे 

माप ओलांडून आली आठवण


२.


शेवटी वादात उरली प्रश्नचिन्हे

आपल्या दोघात उरली प्रश्नचिन्हे


स्पष्ट सांगितले खरे सारे तरीही 

बोलक्या डोळ्यात उरली प्रश्नचिन्हे


राहिले ना बोलणे काही नव्याने 

केवढी मौनात उरली प्रश्नचिन्हे?


बाण सारे उत्तरांचे संपले अन्

आपल्या भात्यात उरली प्रश्नचिन्हे


शांत केले,मी मला समजावले पण 

फक्त आवेगात उरली प्रश्नचिन्हे


संपला नात्यातला विश्वास जेंव्हा 

कोवळ्या हृदयात उरली प्रश्नचिन्हे


कापला गेला गळा निष्पाप जेंव्हा 

आंधळ्या प्रेमात उरली प्रश्नचिन्हे


पीठ झाल्या कालच्या साऱ्या व्यथा पण

आणखी जात्यात उरली प्रश्नचिन्हे


दोन वाटा वेगळ्या झाल्या कधीच्या 

का जुन्या वळणात उरली प्रश्नचिन्हे?


३.


टाळले मुद्दाम ज्याला,त्याच विषयावर लिहू

ठरविले प्रत्येक प्रश्नाचे खरे उत्तर लिहू


नेमकी आहे कशी मी,का तुला कळले खरी

मी मला शब्दांत मांडू ? काय माझ्यावर लिहू


का कुणा ठाऊक नव्हती,टाळली का उत्तरे ?

माैन सारे राहिले त्या गूढ वलयावर लिहू


घेतली माघार दोघांनी पुन्हा आलो पुढे

राहिले आता किती दोघातले अंतर लिहू


शेवटी हाती रिकाम्या,जायचे पण जमविला

जन्मभर जोपासला जो त्या पसार्‍यावर लिहू


क्षण सुखाचा भेटला अन् हासलो तेही लिहू

जाळतो आजन्म जो त्याही निखार्‍यावर लिहू


No comments:

Post a Comment