१.
जरी होऊन मी आख्यायिका जगलो
जगाने लादलेल्या भूमिका जगलो
रडावे वाटले होते... तरी हसलो
अशी आयुष्यभर शोकांतिका जगलो
गडद होता जरीही रंग रक्ताचा
तरीही का असा बेचव, फिका जगलो ?
उभा तर मीच होतो रंगमंचावर
कळेना मी कुणाची भूमिका जगलो?
रडू आलेच नाही शेवटी जेव्हा
बघत खोट्या व्यथांच्या मालिका जगलो
तसा तर एकटा मेलोच असतो मी
जसे म्हटले गझलला प्रेमिका....जगलो!
२.
कसा मी घेतला निर्णय? उघड नाही दिसत
कुणालाही मनावरचा दगड नाही दिसत
रुतत असतो जिव्हाळा कोरडा आता तुझा
तुझ्या भेटीत पूर्वीची निकड नाही दिसत
दफन होते पुन्हा डोळ्यात स्वप्नांचे शहर
अचानक कोणती पडते दरड नाही दिसत
प्रवाहाचा तुला आवेग दिसतो नेहमी
स्वतःवरची निसटलेली पकड नाही दिसत
नकोसे स्वप्न खुपते रात्रभर डोळ्यांमधे
दिवसभर मग मला काहीच धड नाही दिसत
३.
मी बदल केलेत काही आवडेनासे
काळजाचे फेकले तुकडे जुळेनासे
यापुढे होईल ताटातूट कायमची
हात हातातून झाले सोडवेनासे
छान हसते सुख किती सेल्फीमधे क्षणभर
आणि का पुढच्या क्षणी होते दिसेनासे?
काय मी रस्ता कुणाला दाखवू सांगा
घर मला माझेच झाले सापडेनासे
का पुसट झालेत ते तपशील भेटीचे
का जुने संदर्भ सगळे आठवेनासे
रंग झेंड्यांचा असा रक्तामधे भिनला
माणसांचे रक्तगट झाले जुळेनासे
No comments:
Post a Comment