दोन गझला : प्रमोद वाळके

 



१.
  
आठवणींनी उगा हरखणे, चालत जाणे
पडछायेशी बोलत हसणे, चालत जाणे

चांदणशिरव्यांनी भिजवावे मन ममतेच्या
फुले उन्हाची वेचत रडणे, चालत जाणे

जखमांच्या गर्दीत उमलणे अवघड असते
विरहामधले अश्रू पुसणे, चालत जाणे

दुःखाच्या गर्भात उगवतो सूर्य उद्याचा
स्वप्नांसम ही आस जगवणे, चालत जाणे

चमचागोटी खेळ रंगतो आयुष्याचा
काट्यांवरचा पाय उचलणे, चालत जाणे

संग्रामाला नसे युगंधर अंतिम टप्पा
रथ जीवनाचा हाकत जाणे, चालत जाणे

२.

या दुनियेला घर म्हणताना माझे मन लागत का नाही
हे खालीपण ठोकरताना माझे मन लागत का नाही

मी भोगत आहे जन्मसजा समतेची, बौद्धिक जिवनाची
जगण्याचे सूत्त बदलताना माझे मन लागत का नाही

देशात भले जगतो मानव लावून दुहीची शिस्त जणू
माजुरले तन शिलगवताना माझे मन लागत का नाही

या दिशांध झाल्या धरतीवर फुलवा बागा तो वदला ना
हे लोक मढ्यासम जगताना माझे मन लागत का नाही

मी काल म्हणालो सप्तस्वरां गाऊ या क्रांतीची गाणी
तो राग खमाजी गाताना माझे मन लागत का नाही

होईल कसा सुंदर भारत धर्मज झाला अधिनायक तर
हे स्तंभ उद्याचे विझताना माझे मन लागत का नाही

अन्यायाला मारा पत्थर शिकवा समतेची पारमिता
बेहाल निरागस बघताना माझे मन लागत का नाही

जिवनाच्या कातरवेळी का मी हतबल झालो झाकळता
हे जीव जिवास्तव लढताना माझे मन लागत का नाही

का हृदय विखुरले ऐलतिरी त्या पैलतिरी मानव जळता
ही गझल युगंधर लिहिताना माझे मन लागत का नाही

................................
प्रमोद वाळके 'युगंधर'
प्लाॅट नंबर ४०,परफेक्ट सोसायटी,पन्नासे लेआऊट नंबर ५,नागपूर  ४४००२२.
मो. ८३२९३७४९९६.

No comments:

Post a Comment