१.
या दुःखाची व्याख्या इतकी साधी आहे
एक गरज सरली की दुसरी ताजी आहे
अंधाराला दोष देउनी काय फायदा
जर का बघणाऱ्यांची दृष्टी काळी आहे
मला भेटला माझ्या आतिल एकटेपणा
मला म्हणाला बिकट अवस्था माझी आहे
हत्ती,घोडे,वजीर ठरले निरूपयोगी
ज्याने मात दिली ती साधी प्यादी आहे
तो चंद्राची गोटी बनवुन खेळू म्हणतो
कवी समजतो दुनिया इतकी भोळी आहे
मला विठ्ठला इतक्यासाठी माफी द्यावी
माझ्यासाठी माझा विठ्ठल आई आहे
२.
प्रश्न साधा विचारतो आहे
कोण,कोणास ओढतो आहे?
दोर कोणासही दिसत नाही
मात्र मी रोज नाचतो आहे
चंद्र मागेल पोरगी म्हणुनी
आरसा जवळ ठेवतो आहे
धडधडू लागले हृदय माझे
कोण हृदयास छेडतो आहे?
व्यक्त कोणापुढे कसे व्हावे
आपले कोण ऐकतो आहे
ध्येय खुर्ची असेल म्हणुनी तर
तो गरीबांस भेटतो आहे
सारखे रक्त आमुचे..पण तो?
आडवी जात आणतो आहे
स्वप्न येते फिरून माघारी
मी तरी स्वप्न पाहतो आहे
पाहिले ना स्वतःस आम्ही..पण
डाग चंद्रात शोधतो आहे
३.
स्वतः स्वतःशी गप्पा करणे सोपे नसते
एखाद्याचे जागे असणे सोपे नसते
रस्त्यावरील वेडा पाहुन इतके कळले
एखाद्याला विसरुन जगणे सोपे नसते
पिंजऱ्यास ह्या आसमंत जे मानुन बसले
त्या पक्ष्यांचे गगनी उडणे सोपे नसते
रडत एकदा मला म्हणाली जीर्ण झोपडी
या पोटाची आग विझवणे सोपे नसते
दुःख,वेदना,मरण यातना यांच्यापेक्षा
एखाद्याचे रोज धुमसणे सोपे नसते
बाळाचेही काजळ,वेण्या करतो येथे
बापाचेही आई बनणे.. सोपे नसते
.................................
प्रमोद राठोड(नाशिक)
8806010977
तीनही आवडल्या. फार सुंदर. 🙏❤️👏👏👏
ReplyDelete