तीन गझला : पांडुरंग जाधव

 



१.


मी तिला आवडू लागलो

मी मला सावरू लागलो


ती म्हणाली मला हँडसम

केवढा दर्वळू लागलो


ती बिलगली नशेसारखी

आणि मी बडबडू लागलो


कोणता रंग हा लागला

मी असा सावळू लागलो


जाग आली मला शेवटी

मी मला सावडू लागलो


२.


कधी स्वतःला ओळखून बघ

आतला राम जागवून बघ


खुल्या दिलाने आपण भेटू 

तू अहंकार डावलून बघ


बनेल जीवन तुझे प्रवाही

झऱ्यासारखे खळाळून बघ


स्वतःचा सूर्य आहेसच तू

दुसऱ्यांसाठी प्रकाशून बघ


जग सुधारण्याआधी मित्रा

स्वतःस थोडे सुधारून बघ


३.


आहे जिवंत तोवर भेटून जा सखे

जगण्यास एक कारण देऊन जा सखे


उरलेच काय माझे माझ्याजवळ असे

बाकी असेल जर का घेऊन जा सखे


पाऊस आठवांचा डोळ्यांत दाटला

तू दोन थेंब त्याचे झेलून जा सखे


गेले वसंत माझे कित्येक कोरडे

आता बहार बनुनी येऊन जा सखे


हंगाम पावसाचा परतून चालला

ये दोन चार दाणे पेरून जा सखे


.................................

पांडुरंग महादेव जाधव,

 नवीन पनवेल

No comments:

Post a Comment