रेखाचित्र : सतीश पिंपळे
नमस्कार!
‘गझलकार सीमोल्लंघन'चे हे पंधरावे वर्ष. वर्ष २०२३ च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर हा अंक आपल्या समोर ठेवताना आनंदानुभूती आम्हाला होते आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी मान्यवर, नवोदित गझलकारांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यातही महिला गझलकार यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांनी पाठविलेल्या गझलांपैकी निवडक गझलांना या अंकात समाविष्ट केले आहे.
अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे बघत मराठी गझल आता जनमानसांत स्थिरावली आहे. अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, अनियतकालिके,दिवाळी अंक,आदि मध्ये मराठी गझलेला सन्मानाचे स्थान मिळते आहे. पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आंतरजालाधारीत आंतराष्ट्रीय ‘गझलकार सीमोल्लंघन’ या ब्लॉग संग्रहात सहभाग नोंदविणाऱ्या गझलकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब मनाला सुखावते आहे. टाळेबंदी दरम्यान सक्रीय झालेली परंतु नंतर थोडी सुस्तावलेली कवी-लेखक मंडळी पुन्हा नव्या दमाने लिहू लागली आहे. फेसबुक,इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्युब, इ. समाजमाध्यमांवर त्यांची उपस्थिती जाणवू लागली आहे. मराठी गझल संवर्धनासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अनेक संस्था पूर्वीप्रमाणेच गझल मुशायरे, गझल कार्यशाळा आयोजित करीत आहेत. मराठी गझलेतील अनेक जाणकार व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून, तसेच वैयक्तिक पातळीवर नवोदितांना मार्गदर्शन करत आहेत. याचा एकंदरीत परिणाम म्हणजे मराठी गझल लिहिणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. त्यातही सर्व प्रकाशन माध्यमांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, शाळा, कॉलेज, चूल आणि मूल यात गुरफटलेली स्त्री आता मुक्तपणे व्यक्त होऊ लागली आहे. तिच्यासाठी गझल फक्त प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमाचा, संवादाचा विषय मांडणारे माध्यम न राहता प्रत्यक्ष जीवनानुभव मांडण्याचे माध्यम झाले आहे. या वर्षीच्या अंकात असलेली महिला गझलकारांची संख्या लक्षणीय आहे. याचे श्रेय निश्चितपणे कार्यशाळा, विविध समूह आणि वैयक्तिक पातळीवरून तळमळीने मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाला जाते.
गझलेचे तंत्र आणि त्यातून मांडल्या जाणारे विचार म्हणजे मंत्र. हे दोन्ही सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत. ही कसरत करीत करीत कवीचा गझलकार बनतो. उत्तम लिहू लागतो. कालांतराने त्याचा कल उत्तम गझलकार होण्याकडे वाढतो, आणि नेमकी हीच स्थिती गझलकाराला कवितेपासून दूर करण्यासाठी कारणीभूत ठरत असते. ‘गझलकार हा उत्तम कवी असला पाहिजे’, ही जर पूर्वअट असेल तर वेळीच आपण गझलकार झाल्याचा अहंकार सोडला पाहिजे. गझलेचे तंत्र नवशिक्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालेल्या सर्वच मार्गदर्शकांनी आता नवोदितांच्या गझलांतील काव्यमूल्य जोपासण्याची, संवर्धनाची जबाबदारी उचलणे ही काळाची गरज आहे. असे होऊ शकले तरच गझलेतील काव्य, कवीची प्रतिभा, गझलकाराची शैली रसिकांना मुग्ध करीत राहील. जे काव्य हृदयाचा ठाव घेते तेच चिरंतन ठरते. गझलेच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. ज्यांना गझलेचे तंत्र, जीवनानुभव मांडण्याची नाविन्यपूर्ण शैली आणि आशयघनता गझलेतून मांडता आली, तेच रसिकांच्या मनावर अधिराज्य करण्यात यशस्वी झालेत.
'गझलकार सीमोल्लंघन- २०२३’ च्या अंकात १९० सहभागी गझलकारांच्या सुमारे ५५० पेक्षा जास्त गझलांचा आस्वाद आपण या दीपोत्सवापूर्वीच घेऊ शकणार आहात. अनेक आदरणीय गझलकार आणि नव्या उमेदीने लिहिणारे नवगझलकारांच्या निवडक गझलांना आपल्या समोर रसास्वादासाठी ठेवणारा हा मराठी गझल विशेषांक आहे. जगभरातील सर्व गझल रसिकांना हा विशेषांक सर्वांगाने आनंदानुभूती देईल यात शंका नाही.
अंकाच्या ‘विशेष’ सदरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सतीश पिंपळे यांनी ‘चित्रातील गझल: चित्रवाचन आणि चित्रसाक्षरता' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन मांडले आहे. ते म्हणतात, छोट्या-मोठ्या घटना जेव्हा चित्रकाराच्या संवेदनशील मनात प्रवेश करतात तेव्हा रंग, रेषा, आकारांसह त्याच्या शैलीने कॅनव्हासवर अवतरतात. तेच 'चित्रकाव्य' किंवा 'चित्रशब्द' असते. चित्र हे चित्रकाराला सुचलेली गझलच असते ! असे आम्हाला वाटते.तसेच याच सदरात प्रकाशित केलेल्या कालिदास चवडेकरांच्या पाच हझला आपल्याला निश्चितच विशेष आनंद देऊन जातील.
या सोबतच ‘आस्वाद’ या सदरात शिवाजी जवरे यांनी एजाज शेख यांच्या गझलसंग्रहाच्या अंतरंगाची ओळख 'स्वच्छ हृदयाचे झरेच्या निमित्ताने’ या लेखात त्यांच्या प्रवाही लेखन शैलीतून करून दिली आहे. डॉ. शिवाजी काळे यांच्या गझलसंग्रहाचा अतिशय सुंदर रसग्रहणात्मक परिचय डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी 'अकरावी दिशा: एक अस्सल संगमरवरी शिल्पाकृती ' या लेखातून करून दिला आहे. त्याचप्रमाणे किरणकुमार मडावी यांच्या ‘जिंदगी भाकरीच्या दबावात आहे...’ या गझलसंग्रहाचा अरुण विघ्ने यांनी ‘कष्टकऱ्यांचं जगणं अधोरेखित करणारा गझलसंग्रह’ या लेखात ओघवत्या भाषेत परिचय करून देत देतच समीक्षणात्मक भाष्य केलेले आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या कमलाकर राऊत यांच्या गझलसंग्रहाचा सुंदर परिचय शिवाजी गावडे यांनी ‘तरल मनाची गझल : संगीत श्रावणाचे’ या लेखात करून दिला आहे. संदीप वाकोडे यांच्या गझलसंग्रहाचा परिचय ‘प्रगल्भ खळखळता प्रवाह म्हणजे किनारा गझलसंग्रह’ या शीर्षकाच्या लेखात सतीश कोंडू खरात यांनी करून दिला आहे. तसेच 'ममताची गझल’ या लेखात ममता सिंधुताई सपकाळ यांच्या एका प्रसिद्ध गझलेचे रसग्रहण डॉ. संगीता जोशी यांनी रसाळ भाषेत केले आहे.
‘प्रतिभाशाली गझलकार स्व. अनिल पाटील’ हा अविनाश चिंचवडकर यांचा लेख गझलकार अनिल पाटील यांच्या गझललेखन प्रवासावर आणि व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा आहे. त्याचप्रमाणे साबीर सोलापुरी यांचा ‘बाल गझलांचा अभिनव प्रयोग’ हा लेख ‘बालगझल’ या गझलप्रकाराची सविस्तर नोंद घेणारा असून बाल विश्वाच्या, बाल मनाच्या गाभाऱ्यात डोकावणारा आहे. तर सुधाकर कदम यांचा ‘हिंदी चित्रपटातील गझला’ हा लेख १९४७ पासून १९९९ पर्यंत हिंदी चित्रपटातील गझलचा आढावा घेणारा, उजळणी करून देणारा आहे.
अकोलास्थित सतीश पिंपळे यांनी अतिशय सुंदर, वास्तवदर्शक छायाचित्र मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. सोबतच चित्र साक्षरतेवर सुंदर लेखही दिला.यांच्यासह सर्व गझलकार,गझलकारा, अभ्यासक यांच्या लेखन सहकार्याने हा अंक साकार होऊ शकला, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. आजतागायत ‘गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-
दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
- संपादक
संपादकीय नेमके आहे. तंत्राच्या नादात खयाल, कलाटणी हरवू नये एवढीच अपेक्षा. राऊत सरांचे अभिनंदन व त्यांचे आभारही. अंकाकरता प्रयत्न करणा-या सर्वांच्या मेहनतीला एक सलाम.
ReplyDelete- केदार पाटणकर, (गझला, लघुकथा, चित्रपटसमीक्षा)
" गझलकार सीमोल्लंघन-2023 म्हणजे " एक सातत्यपूर्ण गझलसेवा "
ReplyDeleteसातत्याने दर्जेदार अंक वाचकांना दिल्याबद्दल अभिनंदन 💐💐 संपादकीय छानच 🙏
ReplyDelete२०२३ चा गझलकार सिमोलंघन अंक खूप सुंदर झाला आहे!
ReplyDeleteप्रस्तावना उत्तमच लिहिली आहे! 👍
ReplyDelete