बालगझलांचा पहिला अभिनव प्रयोग : साबिर सोलापुरी

 



     मराठी साहित्याला विविध प्रकारानं, प्रवाहानं समृद्ध केलंय. मराठी गझलेच्या प्रांगणात बालगझलेचा एक कोपरा रिकामाच होता. तो काही गझलकारांनी भरून काढलाय. मुळात मराठी गझल लिहिणं अत्यंत अवघड. त्यात पुन्हा मराठी बालगझल लिहिणं त्याहून कठीण काम आहे. म्हणून बालगझल लिहिणं म्हणजे कविप्रतिभेचं कसब पणास लावणे होय. शोभा तेलंग (इन्दूर) डॉ. शेख इकबाल मिन्ने (औरंगाबाद) यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या प्रयोगानं केवळ मराठी गझलेच्या प्रांतात बालगझलेचं नवं दालन उघडलं असं नाही तर त्यांनी मराठी गझलेला सम्यकरूप दिलंय. म्हणून त्यांच्या या प्रयोगाची अधिक नवलाई आहे. शोभा तेलंग यांचा
'सुंदर गझला गाऊ या' तर डॉ. शेख इकबाल मिन्ने यांचा 'उठा गड्यांनो!'हे दोन बालगझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. योगायोग असा की हे दोन्ही बालगझल संग्रह २००७ साली प्रकाशित झाले आहेत. या अगोदर बालगझल हे नाव कोणाच्याही ऐकिवात नव्हते. परंतु आता बालगझल हा काव्यप्रकार हाताळण्यात येत आहे. त्यामुळे बालसाहित्याचा पटही रुंदावत चालला आहे. ही बाब निश्चितच दखल घेण्याजोगी आहे. बालगझलेवर पहिला लेख लिहिण्याची संधी मला प्राप्त झालीय. माझ्यासाठी ही विशेष आनंदाची गोष्ट आहे.

     ज्यांचे बाल गझलसंग्रह अद्याप प्रकाशित झालेले  नाहीत ; परंतु ज्यांच्याकडून बालगझल लेखनाच्या मोठ्या अपेक्षा आहेत अशा बालगझलकारांच्या बालगझलांचाही या लेखात अंतर्भाव करण्यात आलाय. यात प्रफुल्ल कुलकर्णी (नांदेड), नितीन देशमुख (अमरावती), अनिसा शेख (दौंड), नंदिनी काळे (पुणे) ही ठळक नावे आहेत. बालगझल लिहिणाऱ्या गझलकारांची संख्या तुलनेनं काहीशी कमी असली तरी ती गुणात्मक पातळीवर कसोटीला उतरणारी आहे. यात शंका नाही. ही तर सुरुवात आहे. अजून दूरचा पल्ला गाठावयाचा आहे. तो दृष्टीपथात आहे. असे म्हणायला मुळीच हरकत नाही.

     मुळात मुलांच्या भावविश्वाशी स्वतःला अचूकपणानं जोडून घेऊन त्यांच्याविषयी लिहिणं तितकं सोपे काम खचितच नाही. कारण बालगझला वरवर पाहता साध्या सोप्या वाटत असल्या तरी त्या लिहिणं पुष्कळसं अवघड आहे. बालगझलेतील नावीन्यपूर्ण विषय, आशय, लय, ताल याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बालगझला मुलांना सहजगत्या गुणगुणता आल्या पाहिजेत. तिचा ताल चुकला की आकृतिबंध बिघडून जाण्याचा संभव असतो. मुलांना बालगझला अवजड, बोजड, दुर्बोध वाटता कामा नये. यासाठी सोप्या, ओघवत्या भाषाशैलीचा उपयोग करावा लागतो. पाठांतराच्या दृष्टीनंही प्रासादिकता अन् निर्दोष रचना असायला हवी. ही हातोटी साधणे मोठी साधना असते. बालगझलेचे हे शिवधनुष्य शोभा तेलंग व डॉ. शेख इकबाल मिन्ने यांनी त्यांच्या बालगझल संग्रहातून प्रबळपणे पेलले आहे. त्यांच्या बालगझला बालमनास नक्कीच भुरळ पाडणाऱ्या आहेत. हे दोन्ही बालगझल संग्रह बाल वाङ्मयात मोलाची भर टाकणारे आहेत.असं निर्विवादपणे म्हणता येईल.




सुंदर गझला गाऊ या...

     शोभा तेलंग या मान्यवर ज्येष्ठ कवयित्री आहेत. विविध वाड्·मय  प्रकारांतील त्यांची आजवर १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेल्या अनेक  वर्षांपासून 'मुले ही देवाघरची फुले' या  भक्तिभावाने त्यांचं सातत्यपूर्ण लेखन घडत आहे. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात मध्यप्रदेश  सरकारचा राजकवी तांबे प्रादेशिक पुरस्कार, बडोदे गुजरातचा अभिरुची गौरव पुरस्कार, संगमनेरचा कवी अनंत फंदी पुरस्कार आदींचा समावेश आहे. गायक शौनक अभिषेकी,कल्पना झोकरकर,रघुनाथ खंडाळकर,उत्तरा केळकर आदींनी त्यांच्या रचनांना स्वर दिलाय.या संगीतबद्ध रचनांना श्रोत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभलाय.

     सुंदर गझला गाऊ या बालगझल संग्रहाच्या दोन आवृत्त्या निघाल्यात. या पुस्तकाचं बरंच कौतुक झालं. उद्याचे सुजाण नागरिक घडविण्याचे काम बाल साहित्यच जोरकसपणे करू शकते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या अनेक शीर्षकांमधूनच त्यांच्या बालगझलांची नवलाई प्रतिबिंबित होत राहते.चंद्र मित्र मी, अंबराच्या गावी,तारे,माझ्या देशाची माती,भीम एक जन्मा यावा आदी शीर्षकांवर दृष्टिक्षेप टाकला तर त्याची साक्ष पटते. मुलं घोळका करून खेळतात. मुलं एकमेकांचे मित्र असतात 'सुंदर गझला गाऊ या' मधील मुलांना मात्र चंद्राचं भारीच आकर्षण आहे. चंद्राला तो आपला मित्र मानतात. या मुलांना चंद्राशी मैत्री करून अंबराच्या गावी जायचंय. आभाळाला, ताऱ्यांना भेटायचंय. आकाशाच विश्व पाहायचंय. शोभाताई लिहितात -

'मनात जपला चंद्र मित्र मी
करात मिटला चंद्र मित्र मी

उजेड पडता शांत कोवळा
उरी ठेवला चंद्र मित्र मी

असो पौर्णिमा अवसेलाही
खरा समजला चंद्र मित्र मी '

आताची मुलं हुशार आहेतच. त्यांचं ज्ञान, कुतूहल त्यांचं कल्पना विश्व झपाट्यानं बदलत चाललंय. विज्ञानाचं असीम जग कवेत घ्यायला निघालेल्या मुलांना आता पारंपरिक विषयाचा कंटाळा येऊ लागलाय. शोभाताई गमतीजमतीच्या, निसर्ग प्रेमाच्या बालगझलाबरोबरच विज्ञानाच्याही बालगझला लिहितात. बालकांच्या कल्पक सृष्टीतील नवनवे विषय हाताळतात ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

'चमचम, चमचम करती तारे
खेळायाला जमती तारे

चंद्राला सोबत घेवोनी
आकाशावर रमती तारे

त्यांचे अंबर, अमुचे अंगण
वाटाघाटी करती तारे '

आज सर्वकाही संगणकावर चालते. त्याच्याशिवाय कुणाचंही पान हलत नाही. संगणकाच्या विश्वात मुलं खूपच रमून जातात. अभ्यासाच्या अतिरिक्त माहितीसाठी, संदर्भासाठी मुलं लगेच संगणकाकडे धाव घेतात. आजकाल तर अभ्यासाचे धडेसुद्धा संगणकावरून, मोबाईलवरून दिले जातात. मुलांच्या जीवनात संगणकाचे  महत्त्व वाढले आहे. संगणकाच्या मैत्रीवर शोभाताई अशी बालगझल सहज लिहितात-

'मिळून-मिसळून राहू या
सुंदर गझला गाऊ या

कधी कुठे अन् कधी कुठे
सहलीसाठी जाऊ या

संगणकाच्या साथीने
परदेशी डोकावू या

उठा गड्यांनो! '

     डॉ. शेख इक्बाल मिन्ने हे बहुपेडी व्यक्तिमत्व म्हणून सर्वश्रुत आहेत. मुस्लिम मराठी साहित्य चळवळीतील ते आघाडीचे प्रतिभावंत गझलकार आहेत. त्यांची निरनिराळ्या विधातील एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते त्यांच्या व्यवसायात अतिशय कार्यमग्न असतानाही त्यांची अविरतपणे साहित्यसेवा सुरू आहे. त्यांच्या लेखनाचा आवाका मोठा आहे. डॉ. शेख इकबाल मिन्ने यांचा गझल हा सगळ्यात आवडता काव्यप्रकार आहे. गझलेचा सर्वदूर प्रसार व प्रचार व्हावा याकरिता त्यांनी विश्व गझल परिषदेची स्थापना करून पहिले विश्व गझल संमेलन घेण्याचा मान मिळविला. वेळोवेळी गझल संमेलने व मुशायऱ्याचे आयोजन करून त्यांनी अनेक नवोदित गझलकारांना व्यासपीठ मिळवून दिले. गझललेखन कार्यशाळेतून ते गझलकारांना मार्गदर्शनही करतात. कुशल संघटक व प्रभावी सूत्रसंचालक म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक साहित्य  चळवळींशी ते निगडित आहेत. सामाजिक व राजकीय घडामोडीवरील भाष्यकार म्हणूनही यांचे योगदान आहे. रुबाईकार, हायकूकार, नाटककार, गीतकार, बालगझलकार व अभिनेते म्हणूनही त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला आहे.

     'रुबाइत' या त्यांच्या अभ्यासपूर्ण पुस्तकाला पहिला प्रयोग म्हणून रसिकांची मान्यता प्राप्त झाली आहे. 'आय वॉन्ट स्मॅक' ही गर्द विरोधी एकांकिका नव्वदच्या दशकात खूप गाजली होती. त्याला अनेक प्रतिष्ठित पारितोषिके मिळाली आहेत. या एकांकिकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या  आहेत. त्यांनी 'भंडारा', 'नातं', 'चुकीची मिस्टेक' या मराठी चित्रपटासाठी गीत लेखन केले आहे, त्यांच्या गीत गझलांना ज्येष्ठ संगीतकार अतुल दिवे यांनी स्वरांचा साज चढविला आहे. तर सुरेश वाडकर, चंद्रशेखर गाडगीळ, उत्तरा केळकर, ज्योत्स्ना राजुरीया या प्रसिद्ध गायकांनी त्यांच्या रचना गायिल्या आहेत.

     डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी 'उठा गड्यांनो!' असं बालमित्रांनाच उद्देशून म्हटलय. शीर्षकापासूनच या बालगझलसंग्रहाचे वेगळेपण नजरेत भरते. मिन्ने पेशाने डॉक्टर आहेत. त्यांना मुलांचं भावविश्व, मानसशास्त्र चांगल्या तऱ्हेनं ठाऊक आहे. त्या अनुरूप त्यांनी बालगझलांच्या विषयांची निवड केलीय. मुलांना कंटाळा येणार नाही, याचा बारकाईनं विचार करूनच बालगझलांची साध्या सोप्या  शब्दांत मांडणी केलीय. मुलांमध्ये देशप्रेम उत्पन्न व्हावे, उन्नत व्हावे, सोबतच मुलांनी समाजात, शाळेत कसं वागावं - बोलावं? स्वयंशिस्त कशी पाळावी? नेकीनं कसं जगावं? गुरुजनांचा आदर कसा करावा?  याचे संस्कारक्षम धडे त्यांनी दिले आहेत. हे धडे मुलांच्या भावी जीवनात उपयोगी पडू शकतात.

     बालमनावर संस्काराचे लेणे कोरणाऱ्या अनेक बालगझला डॉ. मिन्ने यांनी लिहिल्यात. बालपणापासूनच मुलांवर संस्कार केले पाहिजेत. हे संस्कार मुलांच्या मनात कायम रुजून बसतात. आपण मुलांना जसा आकार देतो तशी त्यांची जडणघडण होत जाते. त्यांचे शेर पहा -

'सत्य नेहमी बोलायचे असते
वचन दिलेले पाळायचे असते

ना उलटून बोल आईबाबांना
सांगतील ते ऐकायचे असते

गुरुजनांचा आदर करूनी अपुल्या
सन्मानाने वागायचे असते'

अशा बालगझलांमुळे मुलांमध्ये सामाजिक व कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो. त्यांच्यात चांगुलपणाची जाण विकसित होत जाते. बालगझलेतून बालमनावर संस्कार करणं हा महत्त्वाचा भाग असतो. सगळ्यांसाठीच देश प्राणाहुनी प्रिय आहे. तो उन्नत होत जावा. साऱ्या विश्वात शोभावा. याकरिता एकता, बंधुता जपणं अगत्याचं आहे. देशावर एखादे संकट आल्यास प्राणपणाला लावून साऱ्यांनी एकदिलानं लढलं पाहिजे. याची शिकवण ते मुलांना देतात -

'या देशाला उन्नत करण्या झटेन मी
प्रगती सारी या डोळ्यांनी बघेन मी

जेव्हा संकट येइल माझ्या देशावर
प्राणपणाला लावून तेव्हा लढेन मी

एकोप्याला, बंधुत्वाला जपताना
जगात साऱ्या प्रत्येकाला दिसेन मी '

जीवनात चारित्र्याला फार मोठं स्थान आहे. चारित्र्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. धन नष्ट झाले तर फार काही नुकसान नाही होत. स्वास्थ बिघडले तर थोडे फार नुकसान होईल. मात्र चारित्र्य नष्ट झाले तर सर्व काही नष्ट होते. माणूस जीवनातून उठतो. म्हणून दुराचारापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. याचे बालकडूही मुलांना बालपणीच दिले गेले पाहिजे. असा संदेशही मिन्ने त्यांच्या शेरातून देतात -

'प्रत्येकाने कसे जगावे
मी जे म्हणतो तसे करावे

राग आवरा, भांडण टाळा
प्रत्येकाशी गोड असावे

आयुष्याची हीच कमाई
चारित्र्याला खूप जपावे '

आपण ज्या महाराष्ट्रात राहतो. त्या महाराष्ट्राची भौगोलिक, प्रादेशिक परिस्थिती मुलांना अवगत व्हावी. याकरिता मिन्ने यांनी महाराष्ट्रावर बालगझल लिहिलीय. त्यातील नद्या, डोंगर, विविधभाषा, संस्कृती याची उपयुक्त अशी माहितीही दिलीय. विद्यार्थ्यांनी ही बालगझल जरूर अभ्यासावी अशीच आहे.

     प्रफुल्ल कुलकर्णी (नांदेड) हे ८४ सालापासून नियमितपणे सकस काव्यलेखन करणारे कवी आहेत. 'यात्री' हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित आहे. नियतकालिकांमधून, प्रतिष्ठित दिवाळी अंकांतून, दैनिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या एका गझलेचा समावेश करण्यात आला आहे. दोन एकांकिकांचे लेखन, एका नाटकातील अतिरिक्त संवादलेखन व दोन नाटकांसाठी गीतलेखन त्यांनी केलंय. त्यांचा बालगझल संग्रह प्रकाशानाच्या मार्गावर आहे.

काहीतरी आगळंवेगळं करून दाखवण्याची मुलांमध्ये मोठी धमक असते. त्यांना वेळीच गुरुजनांचं योग्य मार्गदर्शन लाभणं निकडीचं असतं. त्यांचा वकूब, यांच्यातील हिम्मत याची त्यांना जाणीव करून दिल्यास आजची बालके पुढील जीवनाचा कायापालट करू शकतात. थोरामोठ्यांचा प्रेरणादायी इतिहास त्यांना सांगितला पाहिजे. या दृष्टीनंच कुलकर्णी असा शेर लिहितात.

'घे अर्थ जीवनाचा समजून बालका
चल टाक जीवनाला बदलून बालका'

मानवी जगण्यास अफाट गती प्राप्त झालीय. विज्ञानाचा वेग कमालीचा वाढलाय त्यामुळे विनाशही अटळ होत चाललाय. याची पूर्वकल्पना मुलांना द्यायला हवी. खऱ्या आयुष्याचा विचार त्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे. तर त्याबाबत मुलं विचारप्रणव होऊ शकतील या निखळ उद्देशानं कुलकर्णी हा शेर समोर ठेवतात -

'आयुष्याचा विचार थोडा करा मुलांनो
विनाशतेच्या वेगाला आवरा मुलांनो! '

नितीन देशमुख (अमरावती) हे उत्तम गझलकार आहेत त्यांचा 'प्रश्न टांगले आभाळाला' हा गझलसंग्रह बहुचर्चित ठरलाय. राज्यपातळीवरची कविसंमेलनं व मुशायऱ्यात त्यांचा निमंत्रित सहभाग असतो. दर्जेदार, आशयसंपन्न रचना अन् सादरीकरणातला सफाईदारपणा यामुळं त्यांच्या गझलांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळते. त्यांच्या प्रतिभेला विषयाचे बंधन नाही. काव्य प्रकाराचं कुंपण नाही. प्रौढांसाठी असो की बालकांसाठी ते तितक्याच सक्षमतेनं गझला लिहितात.

शाळेला जंगलाची उपमा देऊन कावळा अन् मांजर यांचा रंगलेला खेळ त्यांनी बालगझलेतून मांडलाय. मुलांच्या निरागस मनात किती सहज प्रश्न उगवत असतात. मोठ्यांना ते प्रश्न पडत नसले तरी त्यांची उत्तरे गवसत नसतात. कावळा अन् मांजर शाळेला आल्यानं आता फक्त माझेच नाव आहे. ही बालसुलभ कल्पना देशमुख यांच्या शेरातून बोलकी करतात.

'अड्ड्याल कावळा अन् पड्ड्याल म्याव आहे
शाळेत जंगलाच्या माझेच नाव आहे '

देव कसा दिसतो. त्याचा स्वभाव कसा असतो. याचं  कुतूहल मुलांच्या मनात ओतप्रोत भरलेलं असतं. पण देवाला भेटता नाही येत. त्यांच्याशी थेट बोलता नाही येत. म्हणून मुलं देवाकडं सरळ मेल  आयडीची मागणी करतात. थोरामोठ्यांनाही सूचणार नाही अशी अफलातून कल्पना मुलांना सहज सुचते. असं देशमुख सांगतात.

'देवा तुझा आम्हाला दे मेल आयडी दे
जाणून घ्यायचा ना तुमचा स्वभाव आहे '

अनिसा शेख (दौंड) या अष्टपैलू कवयित्री आहेत. विविध साहित्य चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध आहे. शालेय जीवनातच त्यांना कवितेची गोडी वाटू लागली. आजही त्याच गोडव्यानं त्यांचं काव्यलेखन अव्याहतपणे सुरू आहे. 'संवाद हृदयाशी', 'बालतरंग' हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेत. ते लोकप्रियही ठरलेत. आद्य शिक्षिका 'माय फातिमा शेख' यांच्या अपूर्व शैक्षणिक कार्यावरील  प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे त्यांनी सुरेख संपादनही केलय. काव्यप्रकार कुठलाही असला तरी त्या चुटकीसरशी लेखणी हातात घेतातच. शाळा अन् मुलांची जडणघडण हा त्यांचा आवडीचा विषय आहे. बालकांच्या भेटीसाठी लवकरच त्यांचा बालगझलसंग्रह येईल अशी अपेक्षा आहे.

शाळेमुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. हे त्यांच्या मातोश्रीनं आधीच जाणलं होतं. म्हणून अनिसा शेख शिकू शकल्या. शिक्षिका झाल्या. त्या आज नावारूपास आलेल्या लेखिका अन् कवयित्री आहेत. याचं श्रेय त्या आपल्या आईलाच देतात.

'शाळेमुळेच माझे आयुष्य छान आहे
शाळेत घालण्याचा आईस मान आहे '

आपण भारतवासी असल्याचा त्यांना अभिमान आहे. मुलांनीही देशाभिमान बाळगायला हवा. असं त्याचं आवर्जून सांगणं आहे. राष्ट्र प्रथम! म्हणून मुलांनी राष्ट्रीय गान हृदयात रुजवून घेतलं पाहिजे.मातीला, देशाला वंदन करायला हवं. हा आदर्श त्या मुलांसमोर बालगझलेतून ठेवतात.

'झालाय जन्म माझा मातीत भारताच्या
मी भारतीय याचा मज अभिमान आहे '

नंदिनी काळे (पुणे) या सुद्धा पेशानं शिक्षिका आहेत. त्यांचं विपुल प्रमाणात लेखन झालेलं असलं तरी पुस्तक अद्याप निघालेले नाही. मुलांनी शालेय जीवनातच ध्येय निश्चिती करावी. रात्रंदिवस खेळण्याचं वेड सोडून देऊन अभ्यासाला प्राधान्य द्यावं. इतकं अभ्यासात स्वतःला झोकून द्यावं मग ध्येय तुमच्या पायाशी लोटांगण घेईल. विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्ग दाखविणारा नंदिनी यांचा हा शेर -

'आहे मनात माझ्या ध्येयास गाठण्याचे
अभ्यास खूप करते ना वेड खेळण्याचे '

आईच्या अजोड त्यागामुळे, तिनं सतत केलेल्या काबाड कष्टानंच मुलाचं जीवन सुखी बनतं. जेव्हा मुलांना चांगले दिवस येतात तेव्हा मात्र मुलांना आईचा सोयीस्कर विसर पडतो. अशी कृतघ्नता न दाखवता आईला सदा सौख्यात ठेवायला हवं. असा पाठ देणारा काळे यांचा हा शेर -

'आई तुझ्या मुळे हे जीवन सुरेख आहे
देते वचन तुला मी सौख्यात ठेवण्याचे '

बालगझलेची काही वैशिष्ट्येही सांगता येतील. कवितेसारखा फाफट पसारा, बालगझलेत नसतो. बालगझलेत एकेक अक्षरावर छंदवृत्ताचं बंधन असतं. त्यामुळे शेर नेमकेपणाने भाष्य करतात. मुलांच्या बालसुलभ खेळकर व खोडकर सवयीचा सच्चा भाव बालगझलांमधून व्यक्त झालाय. तसेच शिक्षण अन् निसर्ग प्रेमाचे संस्कार, खेड्यापाड्यातील बालमन व तेथील टवटवीत वातावरणाचं दर्शन  बालगझलांमधून घडतं. नवनव्या कल्पना, जाणिवा सुलभपणे प्रकट झाल्यात. त्या बाल वाड्·मयाला बळ पुरविणाऱ्या आहेत.

.................................
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३

No comments:

Post a Comment