दोन गझला : ममता

 



१.


भुकेचा स्तर लिहूया

तहानेवर लिहूया


खरी जवळीक कळते

खरे अंतर लिहूया


लिहूया ना सुखांवर

व्यथांची भर लिहूया


उन्हावर...सावलीवर

थरावर थर लिहूया


मुळाशी घाव आहे

जरा वरवर लिहूया


जरा समजून घेऊ

जरा नंतर लिहूया


कुठे शेवट कळेना

असू...तोवर लिहूया


२.


फक्त होईल ते मी बघत राहते

आतल्या आत काळिज तुटत राहते


जर परीणाम माहीत आहे  तुला

मी कशाला तुला आवरत राहते


एक मिसरा फिरवतो पुन्हा पाठ पण

ओळ अर्धी तरीही सुचत राहते


तूच केवळ अशी एक जागा खरी

मी न मागून जेथे मिळत राहते


पूर्ण विसरून गेलास ना तू अता

आजही जे मला आठवत राहते

No comments:

Post a Comment