दोन गझला : एकनाथ गायकवाड



१.

भिक मागण्या पटकूराची झोळी केली
चूड लावली,संसाराची होळी केली

लिलाव झाला माझा जेव्हा भर बाजारी
अल्प दराने सगळ्यांनी मग बोली केली

तो कांचनमृग पाहताक्षणी का आवडला ?
सीतेने मग मनात त्याची चोळी केली

कोप उन्हाचा, घसा कोरडा पडू लागला
चहा घेतला तहान माझी ओली केली

विस्कटलेली होती सारी दुखरी स्वप्ने
बांधून त्यास एका ठायी मोळी केली

चोरीपेक्षा राजनितीचा धंदा भारी
राजपटावर चोरांनी तर टोळी केली

जग झालेले सुख-स्वप्नांच्या स्वार हवेवर
मी दुःखाला तिंबत त्याची पोळी केली

२.

जातपातीचा फुकाचा माज वाटे
माणसाला माणसाची लाज वाटे

पोट जाळायास देहाला विकावे
भोगतो त्याला सुखाचा साज वाटे

वेदनांचे अंतरी काटे जिव्हारी
घातला डोईवरी का ताज वाटे

खंगतो आता किनारा मौन होतो
सागराची शांत झाली गाज वाटे

चोरलेला श्वास माझा जो फुलांनी
कैद झालो मी तयांना आज वाट

भासला जो साव तेव्हा मानभावी
अंतरी भारीच कावेबाज वाटे

...........................................
एकनाथ गायकवाड
जनता विद्यामंदिर ,
त्रिंबक ता.मालवण
जि. सिंधुदुर्ग 416614
मो.9421182337


No comments:

Post a Comment