१.
फक्त एकदा भेटुन जा तू
मग हवेच तर सोडुन जा तू
मला सांगणे जमले नाही
डोळे माझे वाचुन जा तू
हाक मारली इतक्यासाठी
दार एवढे लावुन जा तू
मीच थांबले आहे अजुनी
जरी म्हणालास निघुन जा तू
शेवट व्हावा गोड आपला
एक आठवण देउन जा तू
२.
परिस्थितीचा काठ बदलतो
दुनियेचा मग रंग बदलतो
बदलत नाही काही काही
का मग आपण शहर बदलतो
श्वास थांबला म्हणतो तेव्हा
आयुष्याचा काळ बदलतो
नाते यावर टिकून असते
कोणासाठी कोण बदलतो
दिवस बदलले नाही तरिही
कॅलेंडरचे पान बदलतो
आशय सुंदर आहे. पहिल्या गझलेतील कवाफी म्हणजेच सर्व काफियांची सवलत घेऊन मांडणी केली आहे. भेटून, सोडून, वाचून, लावून, निघून, देऊन असे मराठी भाषेच्या शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे शब्दलेखन असावे; परंतु मात्रापूर्तीसाठी उ हस्व घेतले आहे.
ReplyDelete