तीन गझला : सौ. सुषमा वडाळकर



१.


द्रव्य कमवले, समृध्दीचे गाठोडे‌,

नाही दिसले,  संतृप्तीचे गाठोडे.


कारण कळले अधोगती अन् दु:खाचे,

मी बाळगले, आत्मस्तुतीचे गाठोडे.


जागोजागी वैर भावना मज दिसते,

कुठे टांगले ते प्रीतीचे गाठोडे?


स्वार्थापायी भान विसरलो जगण्याचे,

शोधू कैसे आठवणींचे गाठोडे?


कर्मफळांचा भार वाहुनी दमलो मी,

सोबत माझ्या पूर्वकृतींचे गाठोडे. 


ठाऊक मला, नसते सोबत मरणाला,

का मी जपले ,आसक्तीचे गाठोडे?


सापडली ती जुनीच साडी आईची,

त्यात गवसले सुखशांतीचे गाठोडे .


२.


आपत्तींशी लढता लढता काळिज माझे कणखर झाले,

दु:खांचेही बघता बघता छान सुगंधित अत्तर झाले.


आयुष्याच्या वळणावरती आईची मज छाया दिसली,

त्या आठवणी जपता जपता जीवन माझे सुंदर झाले.


नको मिठाई,नकोत मेवे, कष्टाने मज झोप लागली,

तिखट मीठ अन् भाकर तुकडा, जेवण माझे रुचकर झाले.


धूसर दृष्टी झाली माझी, द्वेषाचा कण कसा अडकला?

नेत्र उघडले गुरुवर्यांनी, वाट चालणे सुखकर झाले.


शुष्क तरूला फुटली पाने, पल्लवीत मन झाले होते,

अंतरात मग पाझर फुटला, विचार सारे निर्झर झाले.


३.


भाषेतले साधर्म्य तू समजून घे,

ते बोलणे, डोळ्यातले ऐकून घे.


अश्रू तुझे प्रीतीत झिरपू दे सदा,

गाणे सख्या हृदयातले गाऊन घे.


छळतोय का, सहवास अजुनी सांग ना!

अलवार तो मधु-स्पर्श तू झटकून घे.


नवरंग उधळित बाग फुलली छानशी, 

नंदनवनीचे रोप तू रुजवून घे.


लाभेल ना, हा जन्म मनुष्याचा पुन्हा,

हे मानवा, संसार तू निभवून घे.


.......................................

सौ. सुषमा राम वडाळकर, 

बडोदे.

No comments:

Post a Comment