तीन गझला : निशा डांगे

 



१.


आयुष्या, मी तुझ्याकडे तर दान कोणते मागत नाही

भरावीस तू माझी ओंजळ तुझी एवढी दानत नाही!


लगाम कसला तरी उधळते एका जागी थांबत नाही

समजावुनही सांगितले पण मन कोणाचे ऐकत नाही!


फार समंजस दिवस वाटतो रोज लावतो नवा मुखवटा

या रात्रीला कढ दुःखाचा कसा जराही सोसत नाही?


माझ्यामध्ये किती वाढला आहे बघ हा तुझा पसारा!

माझ्यामध्ये मलाच हल्ली मी शोधुनही गवसत नाही


वयाबरोबर कर्तव्याची जाणिव सुद्धा वाढत जाते

पाठ वाकते ओझ्याने पण सहसा काही मोडत नाही


स्वतःस आवर आणिक सोडव भावभावनांचा हा गुंता

नकोस होऊ इतका उत्कट असे वागणे शोभत नाही


२.


दिली मात मी वेळोवेळी आयुष्याला

पुरून उरले आहे त्याच्या आव्हानाला


हृदयी धगधगणारा वणवा बारामाही

आमंत्रण मी कशास देऊ वैशाखाला?


काळजामधे फार खोलवर घुसला आहे

कुण्या आपल्याचाच असावा नक्की भाला!


वाट पाहुनी जीव सोडला म्हातारीने

कुणीतरी सांगावा धाडा तिच्या मुलाला


रस्त्यामधला दगड ठेवला काल बाजुला

आज म्हसोबा म्हणू लागले सगळे त्याला


वयात येता कळ्या कोवळ्या फुलून आल्या

भार फुलांचा झाला नाजुकशा देठाला!


कशास मांडू मनातले मी शब्दांमध्ये?

या हृदयाचे सारे कळते त्या हृदयाला



३.


कितीही विरोधात वारा 

असूदे

तुझे ध्येय केवळ किनारा असूदे


निराशेत धावून काळोख आला

उजेडा तुझाही पहारा असूदे


विषारी किती दंश होतील रात्री

मिठीचा तुझ्या पण उतारा असूदे


जगाने जरी ध्वस्त केले, करूदे

तुझा हात माथी उदारा असूदे!


नको बंगला अन् नको अन्य काही

तुझ्या सावलीचा निवारा असूदे


मनाच्या रित्या कोपऱ्याशी कितीही

तुझ्या आठवांचा पसारा असूदे


कसे ऐनवेळेस चुकतात ठोके

जवळ औषधांचा ढिगारा असूदे


.......................................

निशा डांगे/नायगांवकर

6 comments: