सोपान डोके

 


१.

दुःख जेव्हा काळजाला फार होते
ही गझल तेव्हा मला आधार होते

टाकते उलथून मित्रा तख्त जुलमी
लेखणी जेव्हा  तुझी तलवार होते

लेक  नाही  सून  नाही अंतकाळी
शेवटाला  फक्त  काठी  यार  होते

बांधली  बघ दुश्मनाचीही  समाधी
ते  शिवाजी आमचे दिलदार  होते

विठ्ठला येऊ कसा मी दर्शनाला
बंद माझ्या पूर्वजांना दार  होते

मारली होती मिठी मी आपल्यांना
पाठमोरे मात्र त्यांचे वार  होते

सोडले नेऊन त्यांना  आश्रमाला
जन्मदाते बंगल्याला भार  होते

त्यागले वैभव सुखाचे  गौतमाने
ते कळाले सत्य त्यांना चार  होते

तोडतो आहे कशाला झाड मित्रा?
सावली उन्हात त्याची गार  होते

२.

दुःख  वेदना  बरी  वाटते
गझल मला सोयरी वाटते

असो सावळी किंवा गोरी
लेक बापास  परी वाटते

टाळत असते रोज मला ती
हवी हवी का  तरी  वाटते

रोज बिलगते रात्री हल्ली
थंड  हवा  बोचरी  वाटते

घाव फुलांचा खोल असा की
जखम मला भरजरी वाटते

भाग्य लागते अर्थ कळाया
शब्द कला ईश्वरी वाटते

३.

एका घरात दोन चुलींचा धूर निघाला
भाऊ भावापासून आज दूर निघाला

सातबारा करावा ज्याचा त्याचा नावे
एक मताने दोघांचाही सूर निघाला

एक बांधली भिंत मधोमध अंगणातही
माईच्या मग डोळ्यांमधून पूर निघाला

धनदौलत अन् शेती-भाती कमावूनही
बाप बिचारा वाटणीत मजबूर निघाला

मायबाप ते काय कशाला सांभाळावे
वंशाचा तो दिवा फार का क्रूर निघाला

................................
सोपान डोके,रामपुरीकर
मो.9518707344

No comments:

Post a Comment