१.
जीवन गाणे गाण्यासाठी
आनंदाची ठेवा ओंजळ
सुरेल गाणे होण्यासाठी,
सराव करता सोसावी कळ
कधी कधी पण असे वाटते
अबोल व्यक्ती खूप समजली
तिथेच अपुली फसगत होते
समजत नाही डोहाचा तळ
अंगावरच्या शस्त्राचा व्रण
बघ वर्षांनी मिटून जातो
हृदयावरचे शब्द शरांचे
यत्न करा पण ना मिटती वळ
दुष्कृत्यातच जीवन सरले,
हात आणि मन मलीन झाले
किती कराव्या यात्रा आता ?
मन शुद्धीचे नाटक केवळ!
महिलेशी मी मैत्री केली
चुकले माझे काय कळेना
समाज हसतो आणिक म्हणतो
बघा बघा हया वृद्धाचा चळ
जीवनभर मी बीज पेरले
प्रत्येक क्षणी विषवल्लीचे
दिवसाढवळ्या स्वप्न पाहतो
मिळेल का मज आंब्याचे फळ?
जीवनात मी कृपण राहिलो
दानधर्म पण नाही केला
पुरात सारा पैसा गेला
उरात आता केवळ हळहळ
असंख्य लाटा धडकत होत्या तरीहि हा पण स्तब्धच होता
सागर-तीरी एक पाहिला
मौनामधला काळा कातळ!
ब्राह्मणभोजन, पूजन अर्चन
अवडंबर हे हवे कशाला?
पवित्र,सोज्वळ होण्यासाठी
फक्त असावे जीवन निर्मळ
२.
संस्काराची खाणच असते नार खरोखर
पूर्ण घराचा खांबच ठरते नार खरोखर
फुला -मुलांना रात्रंदिवशी विकसित करते
घरच्यांसाठी चंदन बनते नार खरोखर
आला गेला,मित्र -पाहुणा उठबस करते
प्रत्येकाच्या मनात ठसते नार खरोखर
आई बनुनी वृद्धांची ती सेवा करते
रमणासाठी समई जळते नार खरोखर
सायंकाळी वदवुन घेते शुभंकरोती
प्रकाशात त्या देवी दिसते नार खरोखर
३.
नव्या युगाची युगंधरा मी
अन्यायाला देते टक्कर
माझ्यावरती हात उचलला
सदन सोडले क्षणात सत्वर
प्रति दिवसाला उसवत गेले
संसाराचे कच्चे धागे
मुळी न झाला उपाय त्यावर
किती लावले सुंदर अस्तर
वादाला त्या अडसर नव्हता
कुंभाराचे फुटते खापर
रोज रोजच्या मरण्याला पण
नसे मिळाले कधीच उत्तर
जीव आंबला शिळ्या कढी सम
मार्ग दिसेना काय करावे?
नाव घराणे कीर्ती महिमा
उकळत होते मनात अत्तर
सहनशीलता स्त्रीचे भूषण
सहन करावे निमुटपणाने
कडेलोट पण अतीच झाला!
नाहि ऐकले झाले पत्थर
No comments:
Post a Comment