तीन गझला : सुप्रिया हळबे

 



१.


त्या भेटीनंतर तुला विसरणे अशक्य आहे

मी नजरेचा संकेत टाळणे अशक्य आहे


मी लिहीत नाही काहीसुद्धा आईसाठी

आभाळाला शब्दात मांडणे अशक्य आहे


बदलून टाकले उत्तर सारे प्रश्न ऐकुनी

त्या उत्तरात नावीन्य राखणे अशक्य आहे


तो आपुलकीने माझ्यासोबत बोलत असतो

निरपेक्ष मैत्र हे जगास रुचणे अशक्य आहे


मी लिहू लागले, मला वाटले ..सुचले जे..जे

सर्वांना पटणे... अन् आवडणे, अशक्य आहे


पश्चात्तापाच्या आगीमध्ये पोळत असतो 

मेलेल्याला सारखे मारणे अशक्य आहे


मैत्रीमधल्या विश्वासाचा विश्वास तोडला

विश्वासावर विश्वास ठेवणे अशक्य आहे


आघात मनावर सातत्याने झाल्यानंतर

त्या वाटेवरती पुन्हा चालणे अशक्य आहे


या प्रेमाइतके पवित्र दुसरे काही नाही

सौदा करणाऱ्यांना हे कळणे अशक्य आहे


तू हृदयावरती दगड ठेव  दे ..दंड सुप्रिया..!

अन्यायाला दुर्लक्षित करणे अशक्य आहे


२.


शोधले बाहेर ज्याला तो खरेतर आत आहे

देव शोधू मी कशाला नेहमी हृदयात आहे


काजव्यांची साथ आहे अन् सखा लाडात आहे

पूर्ण व्हावी आज इच्छा पावसाळी रात आहे


प्रेम केल्याचा पुरावा पाहिजे ? मिळणार नाही

बंद कर तू प्रश्न सारे मी तुझ्या श्वासात आहे


तो किती निर्मळ मनाने बोलतो साऱ्या जगाशी

चांगल्याला चांगले म्हणणे अजुन रक्तात आहे


सांजवेळी पापण्यांचे दार जेव्हा बंद झाले

त्याक्षणी कळले मनाला मृत्यु या दारात आहे


कान भरणारे तुला मिळतील येथे खूप सारे

टाळ तू या माणसांना हे तुझ्या हातात आहे


नेहमी, ते टाळती कित्येक मुद्दे भांडणाचे  

एक मुद्दा अटळ असतो नाव त्याचे "जात" आहे


भाकरीचा एक तुकडा पाहिल्यावर हासला तो

फक्त पाणी चार दिवसांपासुनी पोटात आहे


३.


दूर कर चिंता जरा हो मोकळा

विठ्ठलाचा लाव जीवाला लळा


निवडली मी वाट माझी वेगळी

मी निराळी मार्ग माझा वेगळा


पोळले आगीत द्वेषाच्या जरी

संयमाने सोसते त्याच्या झळा 


हुंदका दाटून आला ज्या क्षणी

त्या क्षणी पिंडास शिवला कावळा


सोबती नव्हते कुणीही आपले

जमवला होता उगा गोतावळा


माणसाचा स्वार्थ इतका वाढला

आवळा देऊन नेतो कोहळा


बोलके डोळे निरागस लाजले

त्या क्षणी हा जीव झाला बावळा 


पाझरावे हृदय हे मातीपरी

जाणिवांना कोंब यावा कोवळा


सांत्वनासाठी कुणी नव्हते जवळ

धावला मग पंढरीचा सावळा


..................................................

सुप्रिया पुरोहित हळबे, ठाणे


2 comments:

  1. मी लिहू लागले, मला वाटले ..सुचले जे..जे - हा आवडला. लय राखलेली आहे. तसेच, प्रेम केल्याचा पुरावा...मध्ये प्रश्न विचारून लगेच उत्तर देणे हे आवडले. वृत्तात छान बसले. एकूण तीनही गझला फार चांगल्या

    ReplyDelete
  2. खूप छान सुप्रिया 👌

    ReplyDelete