१.
चुकीचे ठरवणे कधी शक्य नाही
तुला मी विसरणे कधी शक्य नाही
लपव भावनांना कितीही सख्या तू
मला त्या लपवणे कधी शक्य नाही
ठसे पावलांचे मिटवले जरी मी
हृदय साफ करणे कधी शक्य नाही
दुरावा तुझ्याशी जरी फार झाला
तुला मी बिलगणे कधी शक्य नाही
नको वाट पाहू जरा ऐक माझे
तुझी भेट घडणे कधी शक्य नाही
२.
वेडेच प्रेम ठरले तू साक्ष द्यायला ये
विरहात आज वेडे केवळ बघायला ये
काट्यातले गुलाबी सुंदर गुलाब हाती
या अंगणात माझ्या थोडे फुलायला ये
होती जरा सुखाची शंका मनात येथे
आहे जसा...तसा मी आता पहायला ये
कायम सखी मिळावी,प्रेमामधे तरसलो
जीवन जुने पुराणे सोबत जगायला ये
आहे तुझी 'प्रतीक्षा' माझ्या मनामधे ह्या
जगतो कसा तुझ्याविन,आता रहायला ये
३.
काव्यात मांडलेल्या पंक्तीत कृष्ण आहे
मानव्य जीवनाचे संगीत कृष्ण आहे
स्मित हास्य सावळ्याचे पाहून दंग झाले
प्रत्येक गोपिकेच्या धुंदीत कृष्ण आहे
सुख - दुःख जीवनाच्या आहेत दोन बाजू
प्रेमात कृष्ण आहे, सक्तीत कृष्ण आहे
मारून एकदा बघ तू हाक श्रीहरीला
येणार माणसांच्या वस्तीत कृष्ण आहे
आनंद मग हरवतो करता विवाद - तंटे
मित्रत्व सांधणाऱ्या संधीत कृष्ण आहे
...................................................
सौ.प्रतीक्षा किरण नांदेडकर
सिंगापुर
No comments:
Post a Comment