१ .
आनंदकंद जैसा काव्यात्म रंग माझा
गझलेत गुंतलेला हा प्राण दंग माझा
जावे कशास आता धुंदीत मी नशेच्या
गझलेत पाहिलेला गहिरा अभंग माझा
आता कशास हरवू स्वप्नात दो घडीच्या
आपसुक भेटलेला सत्यात रंग माझा
दु:खास का डरू मी, काट्यास का भिऊ मी ?
दुलईत पाकळ्यांच्या निर्धास्त संग माझा
देशात माजलेला दुर्गंध प्रदूषणाचा
'शाश्वत विकास साधू', हा नित्य चंग माझा
२.
आजच्या या भ्रष्ट काळी आमचे हे मागणे
देश अवघा बंदिशाला, मुक्त होवो नांदणे
कोणताही पक्ष अथवा राज्यकर्ता येउदे
लोकशाही मागताहे आदबीचे वागणे
मत्त नेते आज देती झुलवणा-या वल्गना
आंधळ्यांना दावती ते भुलवणारे आय *ने*
कोण नेता आज कोठे सांगणे सोपे नसे
कोण करतो राज्य येथे, विस्मयाने पाहणे
वाढते का दाम सारे ? ही कशी भोंदूगिरी
लोकवस्ती गाय बनली, मांत्रिकाचे खेळणे
वाढता हा माज, धोका !...घाबरी शरणागती
जाणत्याला ना मुळी डर, का उगा मग वाकणे ?
.................................
अशोक म. वाडकर
'अक्षर', ए/१४६, फुलेवाडी,
कोल्हापूर ४१६ ०१०
मो.७०२०० ११४०८
No comments:
Post a Comment