१.
जवळुन पराभवाची न्याहाळली दरी
विश्वास मज दिला तू होऊन पायरी
नौकेस कागदाच्या मिळते दिशा कुठे
पाण्यामधे तरंगत असते अधांतरी
वर्गामधून पहिली होती सतत जरी
ठरलीय लेक माझी का शून्य सासरी ?
पडले कमी खरेतर औषध मलम जिथे
तू मारलीस फुंकर झाली जखम बरी
होतो हशा,स्वतः ही हसते फिदीफिदी
करते ब-याचवेळा आयुष्य मस्करी
२.
किनारा स्पष्ट दिसल्यावर उतरणे शक्य व्हावे
कशाला नाव माझी खात आहे हेलकावे
हवा कुठली अचानक लागली आहे नदीला
वसा सोडून ध्येयाचा तिने का भरकटावे
नको अपुल्या मुलीला सासरे सासू अशांना
सुनेने वाटते सगळ्यास सांभाळून न्यावे
कितीदा लावले आहे बरे पाहून त्याला
तरीही दार दु:खाने कशाला ठोठवावे
चिमुकले रंगबेरंगी फुटावे पंख त्यांना
क्षणांनी वाटले फुलपाखरू होउन उडावे
धवल चाफा, सुगंधी वा कधी प्राजक्त होऊ
कधी पानांमधे अपुल्या दवाला साठवावे
मदत झाली कसे उपकार मी विसरू उन्हाचे
जिथे अडवून वाटेवर धुक्याने रोज यावे
३.
केला विहार आधी मनसोक्त माणसाने
नंतर वसूल केली किंमत जलाशयाने
केलेय बाद त्याला *यादीमधून* माझ्या
भलताच एक रस्ता संदिग्ध वाटल्याने
काही कळ्या उमलल्या काही तशाच होत्या
झाडावरून फुलण्या आधीच तोडल्याने
लावू नकोस खिडकी जोरात एवढ्याने
नाजूक काच माझी तडकेलना अशाने
बिनधास्त चालताना वर्तुळ सरावल्याने
होते शिकार केव्हा अपुल्याच सापळ्याने
व्यवहारशून्य ठरले, म्हटले कुणी अडाणी
झाला हिशोब पक्का माणूस वाचल्याने
असतो तिच्यासवे तो ताटामधे बरोबर
केलेय आरतीला गंधीत कापराने
व्वा. छान आहेत तीनही गझला.
ReplyDelete