१.
वेदना भोगून जर मी घट्ट केले काळजाला
मग बहर पाहू व्यथेचा काय करतो जीवनाला
बंद मैफिल थांबलेली ती पुन्हा बहरात आली
साथ मिळता ढोलकीची नर्तकीच्या घुंगराला
वेगळ्या झाल्यात जाती,वेगळे हे धर्म सारे
चल भविष्या ! दाखवूया आरसा ह्या भारताला
एकदा ह्या काळजाचे दार उघडे राहिलेले
अन् व्यथा बिनधास्त आली नेहमीची राहण्याला
चांदण्याचे हार करुनी माळता केसात माझ्या
दाटुनी आभाळ आले आठवांचे त्या क्षणाला
थेंब त्याचे झेलताना तृप्त होते ही धरा जर
का नसावी भावनेची काळजी ह्या पावसाला ?
एकदा जर तीर सुटला तर परत येणार नाही
हाय! वापरतोस मग तू शब्दबाणांना कशाला ?
२.
जरी आहे मऊ शय्या उशाला
समाधानी नसे निद्रा कुणाला
व्यथेचे बेधडक बस्तान बसले
सुखा रुसवा तुझा असतो कशाला
खरे जर बोलतो आहेस आता
भिती घोंगावते कसली मनाला
तुझ्या हातात आहे हात माझा
करूया पार आल्या संकटाला
मनाचा थांग सांगा लागतो का ?
कितीही शोधले त्याच्या तळाला
करावे दूर कायम आळसाला
कशाला दोष द्यावा प्राक्तनाला
३.
मी जरी नेहमी वाटते हासरी
हासताना उरी सल असे बोचरी
सावली दूर गेली जरी कैकदा
सोबती ऊन आहे तरी भरजरी
गाठ गाठायचे जे तुला ते शिखर
फक्त विसरू नको पण प्रथम पायरी
बागडू दे तुझ्या अंगणी बाहुली
पाहिजे जर बरसल्या सुखाच्या सरी
का बहरतो ऋतू हा नव्याने पुन्हा
जर जगवते मला ही जुनी डायरी
फायदा काय देऊन मज लेखणी
कोरडी जर नशीबातली शायरी
मी किती भार वाहू तुझा जीवना
मोकळा कर तुझा फास आतातरी
....................................................
सौ.स्नेहा शेवाळकर,पुसद
जि.यवतमाळ
No comments:
Post a Comment