तीन गझला : मारुती माने


 



१.


हा दिवा विझणार आहे, काळजी घे

यापुढे अंधार आहे,काळजी घे


झाड का लाकूडतोड्याला म्हणाले? 

ऊन बाळा फार आहे, काळजी घे


आपल्यांच्या एवढ्या गर्दीत सुद्धा

एक जण गद्दार आहे, काळजी घे


काव्य एखादे पुढे येईल जन्मी

वेदना गरवार आहे, काळजी घे


सांगण्यासाठी बरे वाईट तुजला

मी पुढे नसणार आहे, काळजी घे


तू निशाण्यावर नको येऊस त्याच्या

तीर तो सुटणार आहे, काळजी घे


२.


येउद्या दृष्टीस ह्या गद्दार एखादा

थेट छातीवर करा ना वार एखादा 


मी दगड आहे तुझ्या नशिबास आलेला

तू मला देशील का आकार एखादा


बंद दरवाजे करा येथून परतीचे

यातुनी घेईलही माघार एखादा


औषधे घेऊनही बेजार एखादा

लागतो मग आवडू आजार एखादा


रिक्तता भरणार 'बाळा 'आपली सुद्धा

आपल्या जागेवरी  येणार एखादा


३.


उताविळ पावलांना सांग समजावून माझ्या

तुझे जग वेगळे आहे जगापासून माझ्या


अडकले पाय माझेही पुढे जातीमधे अन्

तिचा निसटून गेला हात हातातून माझ्या


पुन्हा जखमेवरी माझ्या फिरवला हात कोणी

जुन्याशा वेदना उठल्या पुन्हा दचकून माझ्या


कळेना मी कधी इतका शहाणा होत गेलो

कधी गेल्या कळेना बाहुल्या हरवून माझ्या


कुठे मज चंद्र, तारे, प्रेम-बिम देण्यास जमले

दिल्या गझलेस मी केवळ व्यथा फेडून माझ्या


कशा मी भावना लपवू तुझ्यापासून माझ्या? 

उरी ह्या वाढते धडधड तुला पाहून माझ्या? 


तुझ्या हातात दिसला हात मज दुसऱ्या कुणाचा

भ्रमाचा खून झाला मग तुझ्या हातून माझ्या


.........................................

मारुती भागवत माने

एकुर्का (रोड) ता. उदगीर जि.लातूर

No comments:

Post a Comment