१.
ना ठावही कुठे अन् नाही कुठे ठिकाणा,
आयुष्य माणसाचे, की जीर्ण बारदाणा !
आभास फेसबुक हे, पण यार हेच सच्चे;
प्रेमात हाय यांच्या, झालो पुरा दिवाणा.
संगीत जीवनाचे झाले विराण कैसे;
झंकार संपले अन् हा गोठला तराणा.
हसतो हसायला मी, हृदयात दु:ख आहे;
हसणे हसायचे हे, मी शोधला बहाणा.
मुर्खात काढले मज, माझ्याच माणसांनी;
आता खरोखरी मी झालोय पण शहाणा.
ऐकून सत्य वाणी, अस्वस्थ जाहले ते;
लपले, लपून त्यांनी मग साधला निशाणा.
२.
ओठांवरती येते माझ्या पण मी बोलत नाही
शब्दांचे मी बाण कुणावर सहसा सोडत नाही
पडलो नाही खाली इतका चाटायाला थुंकी
नसते ज्याचे झेलायाचे, त्याचे झेलत नाही
पेलायाचे असते ज्याला, त्याला पेलुन देतो
भीड मुरव्वत उगा कुणाची येथे ठेवत नाही
नाचायाचे कुठे कधी मी, माझे ठरवित असतो
कुणापुढेही नाचायाची माझी आदत नाही
सांभाळू मी कुणाकुणाला, उडते त्रेधातिरपट
वाऱ्यावरती सोडुन देणे, मजला भावत नाही
देव कसा दगडात बघावा कोडे पडते मजला
कशी पुजावी ती वस्तू जी कधीच पावत नाही
प्रामाणिक मी प्रेमामध्ये सदैव असतो म्हणुनी
मागायाला मी हृदयाला कुठेच लाजत नाही
३.
मटकायाचे नाही मजला, भटकायाचे नाही
विनाकारणे इथे कुणाशी, खटकायाचे नाही
जिथे जयाला राहू वाटे, तिथे रहावे त्याने
मला कुणाला त्या बाबीवर, हटकायाचे नाही
नैराश्याच्या गर्तेमध्ये, घेउन जाते जी मज
चुकून मजला त्या वाटेने, फटकायाचे नाही
कळते मजला जबाबदारी, संसाराची माझी
कर्तव्याचे मला घोंगडे, झटकायाचे नाही
दोर जरी हा माझा आहे, मजबुत शाश्वत येथे
मला तरीही फासावरती, लटकायाचे नाही
सदैव असतो तयार घेण्या, शत्रू शिंगावरती
रणांगणातुन भ्याडपणे मज, सटकायाचे नाही
नसेल जर का कुणी योग्य तर, लढणे अयोग्य असते
दुबळ्यांना मज उगाच येथे, पटकायाचे नाही
.................................
अनिल जाधव
अमरावती
9422857060
अप्रतिम !!!
ReplyDelete