तीन गझला : अंजली दीक्षित- पंडित



१.

सांग मी लपवू कशी अस्वस्थता माझी
नेमकी कळली तुला तर सत्यता माझी

ती इथे असते, क्षणामध्ये तिथे जाते
धावते हृदयातली साशंकता माझी

ही तुझी आवड प्रवाही खळखळाटाची
आतुनी ढवळून येते संथता माझी

शब्द जेव्हा उतरुनी आले समेवरती
केवढी भांबावली नि:शब्दता माझी

कोणत्या गुंत्यातले मी प्रश्न सोडवले
उत्तरांनी ठरवली मग पात्रता माझी

एवढ्या चिमण्या कुठुन आल्यात फांदीवर
भंगली आहे मनाची शांतता माझी

पायरीवर टेकला नव्हता जरी माथा
पोळली त्यांना तरी अस्पृश्यता माझी

हाक मृत्यूला दिली मी याचसाठी की
वाटले पडताळुया निष्ठूरता माझी

एकदा स्वप्नात माझ्या बुद्ध हसलेला
हीच आयुष्या म्हणू का मुक्तता माझी

२.

सडा पाहुनी प्राजक्ताचा बहरत असते मी हल्ली
माझ्यामधल्या प्राजक्ताला शोधत असते मी हल्ली

माया,ममता काय असावी कळले आई झाल्यावर
आभाळाच्या हृदयामधुनी झिरपत असते मी हल्ली

तुझ्या स्मृतींचा हळवा कप्पा काल पाहिला रडताना
भेटशील या आशेलाही फसवत असते मी हल्ली

वर्षामागुन वर्ष चालले आयुष्याशी जुळताना
रित्या ओंजळीमधून त्याच्या ठिबकत असते मी हल्ली

सुखाप्रमाणे दुःख नकोसे मिळून सोसू कधीतरी
फक्त एवढे प्रेमाखातर मागत असते मी हल्ली

३.

चिखलामध्ये शापित होउन भेटत असते इच्छा
कर्णरथाच्या चाकालाही रुतवत असते इच्छा

आयुष्यातिल प्रश्न नव्याने शोधत असते इच्छा
उत्तर मिळते तरी त्यातुनी वाढत असते इच्छा

अमरत्वाच्या वरदानावर हासत असते इच्छा
भळभळणारी जखम कपाळी मिरवत असते इच्छा

चकव्यामागुन चकवा येउन भुरळ घालतो तेव्हा
चोरपावली येते अन् खो घालत असते इच्छा

हेतूवरती दरवाजाच्या शंका नव्हती कारण
दुःखाच्याही दारी तोरण बांधत असते इच्छा

आयुष्याची या वळणावर गंमत कळते आहे
समांतराला समांतराने सांधत असते इच्छा

.................................
अंजली दीक्षित (पंडित)
छ.संभाजीनगर
९८३४६७९५९६

8 comments:

  1. Replies
    1. मनापासून धन्यवाद 🙏

      Delete
  2. सुंदर गजला अंजली 👌👌

    ReplyDelete
  3. धन्यवाद ताई ❣️

    ReplyDelete
  4. वाह ताई खूप छान...
    आभाळाच्या हृदयामधुनी झिरपत असते मी हल्ली...
    भेटशील या आशेलाही फसवत असते मी हल्ली वाह खूप सुंदर ताई...

    ReplyDelete