दोन गझला : बाळू घेवारे

 



१.


झाली जुनीपुराणी देवा तुझी कहाणी

आता नको तयांची गातात लोक गाणी


आईस घास नाही फिरतेय माळरानी

कैदेत दीन राजा सत्तेत धुंद राणी


शोधून सापडेना बंदा असल रुपाया

चलनात आज दिसती खोटीच सर्व नाणी


काळीज कातळाचे झाले कसे कळेना

पाझर कुठेच नाही झालेय लुप्त पाणी


का दुःख मागते रे कुंती तुला अनंता

त्यातील मर्म आम्हा कळते न चक्रपाणी


ब्रह्मांड दाखवाया तू शोधले निमित्ता

येथे भल्याभल्यांना कळली तुझी न वाणी


२.


पायाखालचि घेतील तुझ्या काढून इथे वीट विठ्ठला

जरी वाटले भोळे भाविक लक्ष ठेव तू नीट विठ्ठला


परिस्थितीचे रडगाणे ते शोभत नाही जगणाऱ्याला

आकाशाला कवेत घेण्या व्हावे थोडे धीट विठ्ठला


लागत नाही अता वाटते लहानग्याला नजर कुणाची

का लावेना बाळाला मग आई हल्ली तीट विठ्ठला


हयात सारी नामामध्ये शाकाहारी खाण्यामध्ये

मरणादारी नजरेपुढती दिसू लागले मीट विठ्ठला


होत्याचे नव्हतेही होते जर का पडले फासे उलटे

घडोघडीला नकोस लावू उगा कुणाशी बीट विठ्ठला


भ्रष्टाचारी व्यवस्थेवरी सांग ठेवु मी कसा भरोसा

मिळून जावी तुझ्या कोर्टात कायमची क्लिनचीट विठ्ठला

No comments:

Post a Comment