१.
गोळा करून ठेवू ओल्या क्षणा क्षणाला
जावेच लागते जर हस्तात पावसाला
येतील पाखरे का परतून एकदा ती
ही आस लागलेली ओढाळ उंबऱ्याला
धारेत नाद मंजुळ आहे झऱ्या तुझ्या पण
होउन प्रपात तोडी ती धार कातळाला
कोजागरीस आला खिडकीत चंद्र हसरा
नंतर पुढे पुढे तो घरचाच एक झाला
येईल का दिवस तो या जीवनात माझ्या
लावेन हात का मी गाठून मृगजळाला
घोड्यासमान माझ्या या धावतात इच्छा
घालू लगाम कुठल्या आणून संयमाला
ठेवू कुणामुळे का दु:खी मनास माझ्या
यास्तव निवांत बसते बिलगून मी सुखाला
विश्वासघात पचवत जो तो पुढे निघाला
'विश्वास' पाहुनी हे दोलायमान झाला
तो पाठबळ कुणाचे त्याला नको म्हणाला
पारा हवाच असतो मागून आरशाला
२.
तिची जाणुन लहर प्रत्येक हा सांभाळतो वारा
करांनी वाहत्या अलगद हवा कवटाळतो वारा
सहज संवाद होताना बटांशी बोलतो वारा
मनाने गुंतल्यानंतर बटांवर भाळतो वारा
बकुळ,चाफा,सुगंधी केवडाही सारखा त्याला
सुगंधी पोचवत वार्ता किती गंधाळतो वारा
इरादा नेक त्याचा की हवे पाणी शिवाराला
सरी याव्या म्हणुन आता ढगांना चाळतो वारा
कधी देशात भांडण जुंपले अन् पेटली ठिणगी
हवा जातीयतेची देत का चेकाळतो वारा?
इथे निष्पाप मेला न्याय त्याला द्यायचा कोणी?
पुरावे जीव गेल्यावर पुन्हा धुंडाळतो वारा
व्यथेचा तापलेला ग्रीष्म करतो काहिली माझी
सुखाचा गारवा मी मागते पण टाळतो वारा
३.
किती ती मौन राहिल? व्यक्त होते भांडणाने
तसाही स्फोट होतो वाफ मोठी कोंडल्याने
त्वचेवर स्पर्श वाऱ्याने कितीसे ठेवलेले
किती स्पर्शात झाला व्यक्त तो साधेपणाने
व्यथांना पेरतो वाटेत माझ्या काळ जेव्हा
सजवतो वाट माझ्या जीवनाची चांदण्याने
उसवली वीण नात्यातील नाजुक जर अवेळी
तरी सांधेल धागा समजुतीचा जोडण्याने
कमी नव्हतीच झाडावर कधीही पाखरांची
पळाली पाखरे ते झाड मोठे वाकण्याने
जगाने ठेवली नावे तमाला कैक वेळा
उजळते चांदणे सुद्धा तमाच्या कोंदणाने
फुलांची वाढलेली मागणी या कारणाने
कळ्यांना कोवळ्या ओवू नका ना दाभणाने
व्वा. क्या बात है. सर्वच गझला आवडल्यात.
ReplyDelete