१.
निर्माण होत आहे नुसतीच झुंडशाही
संकेत देत असते आडून बारमाही
निर्भीड खांब चौथा टिकवून ठेव भाऊ
दुबळी कशास करतो अपुलीच लोकशाही
पैशात मोजल्यावर झाला गुलाम समजा
सावर जरा खुबीने अपुली खुशाल बाही
हे शब्द चंदनाचे परखड भविष्य वाणी
वृतांत सत्यवादी देणार वाहवाही
देशास तारणारा ख्याती चहू दिशांनी
लोभास सोडल्यावर घडणार सर्व काही
या मोडक्या घराच्या ताटीस वाचवा हो
धर्मांध भोवऱ्याची देऊ नयेच ग्वाही
हातात शस्त्र आहे ते पेर कागदावर
ऐटीत ठेव जनता,संपव हुकूमशाही
२.
पाठीत खंजिराला बांधून ठेव पोरी
पात्यास धार थोडी लावून ठेव पोरी
देशास गर्व आहे रणरागिणी स्त्रियांचा
तू शान भारताची राखून ठेव पोरी
डोळ्यात वादळाने घेराव घातल्यावर
गलबत लगेच तेथे ओढून ठेव पोरी
लचकेच तोडताना प्रत्यक्ष पाहिल्यावर
त्या हिंस्र श्वापदाला कापून ठेव पोरी
चौफेर वासनांचे षडयंत्र चाललेले
भात्यात बाण तेंव्हा राखून ठेव पोरी
व्याकूळ जीव झाला डोळे भरून आले
सन्मान लाचखाऊ फोडून ठेव पोरी
येईल वेळ जेंव्हा लावू हिशोब सारा
तो एक एक शिक्का मोजून ठेव पोरी
३.
जरी गाव माझे नकाशात आहे
इथे फार धोका पिढीजात आहे
पुरावे कशाचे तुला सांग देऊ
कुठे नोंद माझी रकान्यात आहे
कधी विश्वविद्यालये या द्विपाची
गुरू-कुल असे का तुला ज्ञात आहे
चिरडले कसे बोलता येत नाही
भला गावगाडा दबावात आहे
मिलोचा नको आठवू काळ सारा
कधीचा तिच्या मी विरोधात आहे
कसा चेतवावा दिवा अंतरीचा
इथे रौद्र वादळ सुसाट्यात आहे
................................................
पुष्पा पुंडलिक दलाल
धामणगाव रेल्वे
9960394736
अभिनंदन. छान गझला आहेत सर्वच.
ReplyDelete