१.
मागणे पूर्ण कर फार काही नको
फार काही नको फक्त 'नाही ' नको
साथ दे जीवनी हाथ सोडू नको
हो कुणाची मला आज ग्वाही नको
एकदा कौतुकाने पहा तू कधी
या जगाची मला वाहवाही नको
बोलते का अशी गूढ शब्दांत तू
हे इशारे तुझे बारमाही नको
या मनाला सखे ओढ आहे तुझी
सूर्य अन् चंद्र हा चांदवाही नको
२.
डोळ्यात झोप नाही स्वप्नात काय मागू
खोटे जगी मुखवटे सत्यात काय मागू
सोडून डाव अर्धा गेली कुठे असावी
धोका सदा मिळाला प्रेमात काय मागू
मागा तुम्ही कितीही पण पावतो कुणाला
पाषाण देव आहे नवसात काय मागू
सारेच ग्रह अमंगळ या कुंडलीत माझ्या
फोडून नारळांना भाग्यात काय मागू
ना ऐकला कुणीही आवाज आर्त माझा
कंठात जीव आला मौनात काय मागू
ही फाटकीच झोळी घेऊन रोज फिरतो
दानत कुणात नाही खैरात काय मागू
स्थिर एक क्षण बसेना, मन स्वैर धावते का
ना लागते समाधी ध्यानात काय मागू
३.
कुणाच्या सांगण्याने मी चुकीचे वागले नाही
असत्याच्या दबावाने जराही वाकले नाही
जरी केली कुणी ईर्ष्या, तरी दुर्लक्ष केलेले
पचवले दुःख सारे पण विषारी बोलले नाही
कितीही वेदना झाल्या, मुकाट्याने सहन केल्या
गिळत गेले स्वतःचे दुःख कोणा बोलले नाही
स्वतःच्या फायद्यासाठी कुणा ना वापरत गेले
अमीषाला नको त्या एकदाही भाळले नाही
कधी वेळी प्रसंगी जाहले अपुले जरी परके
तरी दूषण कुणाला मी कधीही लावले नाही
कळत होते मला आता बदलले रंग लोकांचे
चुकीचा रंग लावूनी स्वतःला माखले नाही
मने सांभाळली आयुष्यभर त्यांची तरी सुद्धा
खऱ्याने वागणे माझे कुणाला भावले नाही
कधीही थांबले नाही, निरंतर चालते आहे
व्रताला घेतल्यानंतर कधीही टाकले नाही
धनाचा गर्व ना केला, कधीही माजले नाही
गरीबीतून जगताना कधीही लाजले नाही
...............................
सौ.रश्मी कौलवार
पंढरपूर
No comments:
Post a Comment