तीन गझला : स्मिता गोरंटीवार

 




१.


मी पुन्हा थांबेन जर ती यायची आहे

शेवटाची पालखी उचलायची आहे 


भाकरीचा चंद्र रडतो रोज ताटाशी 

पोट भरल्यावीन ढेकर द्यायची आहे


ह्या उठाठेवी पुरे नाठाळ लोकांनो

ऐतखाऊंना उपरती व्हायची आहे


विठ्ठला वारीमधे संवादतो आहे 

खूप घाई  भेटल्यावर यायची आहे


लावली समई तिन्हीसांजा जशा झाल्या 

रात्र दिवसाशी मला सांधायची आहे


पाहतो माझी सहनशक्ती किती आता 

ही विनाकारण कुशी पलटायची आहे


चेतनेचा स्रोत होउन एकदा पाहू 

नाव माझी पैलतीरी न्यायची आहे 


२.


धुंदीत फिरतोस फितवून आयुष्य

वरचढ तुझे हे तुझ्याहून आयुष्य 


नाही दिले मी झुगारून अस्तित्व

पस्तावले फार भोगून आयुष्य 


सरला उन्हाळा पुढे जून येताच

आल्हादले पावसाहून आयुष्य


चिंता भरीला तुझी काय देतोस

माझे विवशतेत याहून आयुष्य


सोबत हवीशी तुझी,राहुनी  दूर

आश्वासले आजमावून आयुष्य


हद्दीत माझ्या डिवचले तुला मीच

ना भांडले पण कडाडून आयुष्य


झाले  रबर खोडण्याला चुका त्याच

सुंदर बनवले स्वतःहून आयुष्य


केलेत व्यंजन किती गोड पेरून

संपृक्त झाले सुखावून आयुष्य


केली उन्हाची न तक्रार केव्हाच

माझे निघाले सुलाखून आयुष्य


३.


आपली प्रत्येकवेळी सांगतो ऐपत कशाला

ऋण चुकवण्याला पित्याची लागते दौलत कशाला 


भांडुनी थकला न तेव्हा,का तरी दमलास नंतर

आज हृदयाशीच माझ्या थेट संगनमत कशाला 


तो मला बोलून गेला दे तुझा अभिप्राय नक्की

आजवर दुर्लक्षिल्यावर सांग देऊ मत कशाला


तारका येतात माझ्या अंगणी भेटीस रोजच

भेटल्यावर रोज कोणी पाहिजे स्वागत कशाला


स्वाक्षरी करता न आली दाटल्या अश्रुंमुळे  तर

लेकरांच्या निर्णयावर  व्हायचे सहमत कशाला


बांधली डोळ्यांस पट्टी देव ओळखतो तरीही

ज्ञान स्पर्शाचे हवे अंधापरी अवगत कशाला


तू निराकारी,समज मी ठेवला माझ्या मनाशी

आपल्या दोघात आता पार्थिवाची प्रत कशाला


.................................

स्मिता गोरंटीवार वणी

9850079959

2 comments: