तीन गझला : डॉ स्नेहल कुलकर्णी

 





१.

प्रेमासाठी सूर्य उगवता अंधाराला दान दिला
तो आला त्या वाटेला मी पूर्वदिशेचा मान दिला

जरी सावळी म्हटले नाही वारकऱ्यांनी तिला कधी
रखुमाईला कुठे चेहरा अंमळ गोरापान दिला

मजा घ्यायची सोडुन सावध करत राहिला मूर्ख मला
नौकानयनासाठी माझ्या सोबत का विद्वान दिला

पक्षपात चालवला त्याने असे एकदम कसे म्हणू
रंग मनोहर नाही तेथे गंध फुलाला छान दिला

निवडू कुठले शब्द नेमके शेर मुकम्मल करताना
लिही म्हणाला संन्याशी अन् खयाल पिंपळपान दिला

पान हलेना शिवशंभूचे त्याच्यावाचुन,काय करू
देवाआधी पुजण्याइतका नंदीला सन्मान दिला

ऊनपावसासोबत कसली मायावी केलीस युती?
बोल दिशा तू इंद्रधनूला रंग कसा वरदान दिला

२.

एवढीसुद्धा कसर जगण्यात नाही सोडली
पाहिजे बाभळ तिथे पुड चंदनाची जाळली

का बरे माझ्या मनाला गोष्ट इतकी लागली
मी दिलेली भेट त्याने पायरीवर ठेवली

कान देणाऱ्या कळ्या अंगभर फुलतील का..?
(मी फुलांना अत्तराची माहिती सांगीतली)

भेद जाणवला मला दोघात केवळ एवढा
वेदनेचा अंश म्हणजे पूर्तता सौख्यातली

शेवटी ठरले अडाणी मूर्ख वेडी,दुष्टही
मी तुझ्या नजरेत माझी सत्यता पडताळली

विठ्ठला,सासू मला सोडेल का वेशीपुढे?
रुक्मिणीवाचून दिंडी पंढरीला चालली

पावले थकण्याअगोदर जन्मगावी पोचले
भेटल्या वाटा मला की मी 'दिशा' सांभाळली

३.

मी घाटावर घुटमळताना खेचुन घेते ध्यान कशाला
जीव जडावा माझा इतकी स्मशानभूमी छान कशाला

अशी धारणा झाली तर मी कार्य विधायक कसे करावे
होते आहे नाव तसेही  मंबाजीला मान कशाला

कवडीमोलाने आताशा विकली जाते तुमची इज्जत
प्राप्त गरीबी होण्याइतका.. पैसा केला दान कशाला

निराकार तो आहे याची तुला कल्पना आहे तर मग
देव अजागळ दिसेल इतकी देव्हाऱ्याची शान कशाला

उपनिषदांच्या चर्चेसाठी त्याचे येणे,समजू शकते
गोष्ट चिऊची सांगायाला काशीचा विद्वान कशाला

दिली घेतली माया आणिक स्वर्गसुखाचा अनुभव आला
जन्म साजरा करण्यासाठी अध्यात्माचे ज्ञान कशाला

शब्द ऐकले कठोर तेव्हा क्षितीज सुद्धा चिंतित झाले
'दिशा' म्हणाली आभाळाला.. मातीशी संधान कशाला
.................................
दिशा
(डॉ. स्नेहल कुलकर्णी )
गारगोटी 9922599117

3 comments:

  1. अप्रतिम गझला

    ReplyDelete
  2. प्रत्येक शेर अप्रतिम 🌹🌹

    ReplyDelete
  3. वाह.. वाह.. अप्रतिम.. स्नेहल ताई 👌👌👌👌👌💐💐💐💐💐

    ReplyDelete