तीन गझला : संदीप नाथा आगाणे

 



१.


मागे कशा पळावे, पाहून एक मृगजळ

सरते हयात सारी, हाती न येत मृगजळ 


रानामधील चकवा,की भास तो असावा

अस्वस्थ मन तरीही, करते उगाच मृगजळ 


समदीच राख झाली, एकूण जिंदगीची

कळते परी वळेना, असले खट्याळ मृगजळ 


मोहात ओढले अन्, का? दूर ते पळाले

दिसले कशास होते, काही क्षणास मृगजळ 


थांबायचेच आहे, मजला कुण्या ठिकाणी

कोठे कधी कसे ते, ठरवू नकोस मृगजळ 


२.


काळजाने काळजाला, एवढे का घाव द्यावे

त्या व्यथेला ऐकण्याला, लोक पै देऊन यावे 


संपणाऱ्या या कथेचा, होत का नाहीच शेवट

शेवटाचा भाग म्हणता, शंभरीच्या पार जावे 


गाळलेले नाव माझे, का मुखी ते आज आले

आटलेल्या त्या झऱ्याने, आज कैसे पाझरावे 


तू बिलगशी सांजवेळी, लख्ख काळोखात पटकन 

यौवनाची आग उसळे, त्यात तू-मी एक व्हावे 


येत होती जात अडवी, आज ही शेंडेफळाच्या

धर्म-जाती पाहुनी का, मग फुलांनी मोहरावे 


३.


तुझ्या वाटेतला काटा,मला ना व्हायचे होते

खरे सांगू तुझ्यासोबत, मलाही यायचे होते 


दिशा का भिन्न होत्या त्या, अशा या एक ध्येयाच्या

कसा चुकलो कळेना मग, कुठे मज जायचे होते 


असे का आज वाटे मज, उमजलो मी तुला नाही

उमजलो मी तुला असतो, मला वाचायचे होते 


कसा तो भाग झालो मी, उगा शिरकावला गेलो

असा तो डाव होता जो, मला जिंकायचे होते 


निघूनी जा परत येऊ, नको आता मनी ध्यानी

स्मृतींना त्या तुझ्या कायम, असे काढायचे होते 


..............................................

संदीप नाथा आगाणे,

टिटवाळा.

मो.८०९७७८०३८९.

No comments:

Post a Comment