१.
जगण्यासाठी ठोस असावे काही कारण
आयुष्याला मिळत रहावे झपाटलेपण!
क्षणात हसते रुसते सखयी मी गोंधळतो
असे वाटते प्रेम कशाला करतो आपण!
रस्त्यावरती काळच दडला जागोजागी
एक चूकही होऊ शकते जिवास अडचण!
ग्रीष्म सोसण्यामधेच त्यांचे जीवन सरते
कळतच नाही केव्हा येतो जातो श्रावण!
कधी जिंकतो मी येथे अन् कधी वेदना
सुरूच असते आमच्यामधे कायम भांडण!
ती नसल्यावर घरास उरती केवळ भिंती
ती असल्यावर घरास येते खरेच घरपण!
लेक लाडकी काल सासरी निघून गेली
मागे उरले केवळ आता उदास अंगण!
रघुनाथ जसा आवडता गझलेचा झाला
श्वासांसोबत तिचेच तर करतो पारायण!
२.
भूक कितीही जरी हावरी झाली
चंद्राची ना कधी भाकरी झाली!
दिवस जरी छळवाद करुनी गेला
साजण येता रात्र बावरी झाली!
भुंगा भिरभिर करू लागला आणिक
एक कळी आणखी लाजरी झाली!
काट्यांचाही बागेवरती दावा
मती तयांची का निलाजरी झाली?
घर नावावर होते ज्यांच्या त्यांना
कशी पारखी आज ओसरी झाली!
जायचे मुळी नावच काढत नाही
एक वेदना अशी सोयरी झाली!
गोड सखीची साथ लाभली आणिक
उभी जिंदगी जणू बासरी झाली!
३.
कोण जाणे नेहमी वादात होतो
प्राक्तनाच्या मी जणू हातात होतो!
याचसाठी भाग्य माझे थोर म्हणतो
मी सखीच्या नेहमी ह्रदयात होतो!
वय जरी झाले तरी मी ताठ आहे
शेवटी माझ्याच मी ताब्यात होतो!
भरडल्यांना सांत्वना देऊ कशी मी?
मी स्वतःही त्याच तर जात्यात होतो!
आजही ना भेट झाली बघ स्वतःशी
एवढा मी कोणत्या कामात होतो?
खूप काही हरवले तेव्हा कळाले
नेहमी माझ्याच मी तो-यात होतो!
शांतता गावातली खाण्यास उठते
जिंदगीभर धावत्या शहरात होतो!
..................................................
रघुनाथ पाटील
पिंपरी चिंचवड
खूप छान !!!
ReplyDelete