१.
तुझ्या आठवांची गझल होत आहे
मुक्या भावनांची गझल होत आहे
भिजूनी जरा आज गेलेत डोळे
तुझ्या आसवांची गझल होत आहे
कुठे वाट गेली मलाही कळेना
खुळ्या पावलांची गझल होत आहे
हवा पावसाळी मला त्रास देते
सुन्या वेदनांची गझल होत आहे
जिथे हरवले ते नभी चंद्र तारे
तिथे तारकांची गझल होत आहे
२.
जखमेवरती खपली माझ्या धरू लागली
नात्यांमधली गोडी आता कळू लागली
तुझ्याविना का उदास वाटत आहे श्रावण
सर प्रेमाची डोळ्यामधुनी झरू लागली
किती किती या दुःखाचा मी हिशोब देऊ
आयुष्याशी गाठ अताशा पडू लागली
सूर्याने पण अंधाराशी सौदा केला
वात दिव्याची मंद होउनी विझू लागली
लेक लाडकी वयात आली जेव्हा माझी
विचित्र शंका मनास या पोखरू लागली
३.
नवीन काही सुचते आहे हल्ली हल्ली
शब्दांमध्ये रुजते आहे हल्ली हल्ली
वेलीवरती कळ्या टपो-या फुलून आल्या
हळूहळू दरवळते आहे हल्ली हल्ली
ग्रहण लागले कुठून त्या चंद्राला माझ्या
उदास होउन फिरते आहे हल्ली हल्ली
स्वार्थापुरते नाते होते त्यांचे केवळ
कोण आपले कळते आहे हल्ली हल्ली
लाभत नाही मनास माझ्या जरी शांतता
त्याच्यासाठी झुरते आहे हल्ली हल्ली
..................................................
सौ.ज्योती.प.शिंदे
रोहा - रायगड
मो: ९८५०२०३८६८
अप्रतिम👌👌💐💐
ReplyDeleteसुंदर 👌🏻👌🏻
ReplyDelete